महाराष्ट्र पोलिसांना 58 राष्ट्रपती पुरस्कार, बिहार पोलिसांना किती? : गृहमंत्री अनिल देशमुख

| Updated on: Aug 24, 2020 | 6:37 PM

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस सक्षम असल्याचं स्पष्ट केलं (Anil Deshmukh on Maharashtra police).

महाराष्ट्र पोलिसांना 58 राष्ट्रपती पुरस्कार, बिहार पोलिसांना किती? : गृहमंत्री अनिल देशमुख
Follow us on

रायगड : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस सक्षम असल्याचं स्पष्ट केलं (Anil Deshmukh on Maharashtra police). “महाराष्ट्र पोलिसांचं ट्रॅक रेकॉर्ड तपासा, आतापर्यंत 58 राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहेत. बिहारला किती हे पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहेत हे कळेल,” असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं. ते रायगड दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी आज रोहा येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाचीही भेट घेतली. तसेच या प्रकरणी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करणार असल्याची घोषणा केली.

अनिल देशमुख म्हणाले, “महाराष्ट्र पोलीस अतिशय सक्षम आहे. अनेक वर्षांपासून त्यांची तुलना स्कॉटलंड पोलिसांशी केली जाते. त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर महाराष्ट्र पोलिसांना सर्वाधिक 58 राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहेत. त्यात तपासाबाबत महाराष्ट्राला 10 पुरस्कार मिळाले आहेत. मला कोणत्याही राज्याची तुलना करायची नाही. पण बिहार पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांना त्यांच्या कामासाठी मिळालेल्या पुरस्कारांची माहिती घेतली तर महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहेत हे कळेल.”

“आम्ही जेव्हा सुशांत प्रकरण मुंबई पोलिसांकडे दिलं तेव्हा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने याचा तपास केला. सर्वोच्च न्यायालयाने देखील मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे. निकालपत्रात मुंबई पोलिसांनी योग्य तपास केल्याचं म्हटलं आहे. आता हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस सीबीआयला या प्रकरणात सर्व सहकार्य करेल. त्या पद्धतीने सहकार्य करण्याचं काम सुरु आहे,” असंही अनिल देशमुख यांनी नमूद केलं.

“रोहा बलात्कार-हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती”

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रोहामधील तांबडी बलात्कार-हत्या प्रकरणी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्त करत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, “तांबडी-रोहा प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल. या प्रकरणी अॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारकडून नियुक्ती केली जाईल.” असं असलं तरी ठामपणे किती दिवसात या प्रकरणी आरोपपत्र दाखल होणार हे अनिल देशमुख सांगू शकले नाही.

महाराष्ट्रात ई-पासची सक्ती कायम राहणार : अनिल देशमुख

अनिल देशमुख यांनी ई-पासबाबत मोठी घोषणा केली. केंद्राने ई-पास आवश्यक नसल्याचं म्हटलं असलं तरी महाराष्ट्रात सध्या तरी ई-पास आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. अनिल देशमुख म्हणाले, “केंद्र सरकारने वाहतुकीबाबत काही नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोललो आहे. आपण काही काळ निर्बंध कमी केले. मात्र, त्यानंतर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढला. सुरुवातीला 3 महिने ग्रामीण भागात कोरोना नव्हता. मात्र, निर्बंध कमी केल्यानंतर संसर्गाचं प्रमाण वाढलं. त्यामुळे सध्यातरी महाराष्ट्रात ई-पासबाबत आहे तेच नियम राहतील. काही दिवसांनी यावर पुनर्विचार केला जाईल.”

काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर बोलणं अनिल देशमुख यांनी टाळलं. हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजप किंवा अन्य पक्षांनी त्यात ढवळाढवळ करण्याचं कारण नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्या विषयावर निर्णय घेतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput Case Live | सिद्धार्थ, नीरज, रजत डीआरडीओ कार्यालयात, समोरासमोर बसवून सीबाआयकडून चौकशी

दररोज गांजाचे सेवन, फ्लॅटमध्ये भुताचा भास, सुशांतच्या कूककडून धक्कादायक खुलासे

Sushant Singh Rajput Case | CBI पथक चौकशीसाठी रियाच्या घरी जाण्याची शक्यता, चावीवाल्यापासून सुशांतच्या घरी पोहोचणाऱ्या पोलिसांची चौकशी

Anil Deshmukh on Maharashtra police