मोदी-शाहांविरोधात बोलताना सांभाळून बोला; आशिष शेलारांची जितेंद्र आव्हाडांना ताकीद

| Updated on: Jan 06, 2020 | 6:58 PM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात बोलताना सांभाळून बोलण्याची ताकीद आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिली.

मोदी-शाहांविरोधात बोलताना सांभाळून बोला; आशिष शेलारांची जितेंद्र आव्हाडांना ताकीद
Follow us on

मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यालय (जेएनयू) येथे रविवारी रात्री झालेल्या हिंसाचारावरुन महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे नवे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे (Ashish shelar slams Jitendra Awhad). देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात बोलताना सांभाळून बोलण्याची ताकीद त्यांनी दिली आहे(Ashish shelar slams Jitendra Awhad).

‘जितेंद्र आव्हाड एक जबाबदार कॅबिनेट मंत्री झाले आहेत. तेव्हा आता केवळ आमदार असल्यासारखं वागू नका आणि या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यावर बोलताना सांभाळून बोलावं अशी ताकीद आम्ही त्यांना देतोय’, असं आशिष शेलार म्हणाले. त्याचबरोबर ‘ते आता गृहनिर्माण मंत्री नसून गृह कलह मंत्री झालेत’, असा घणाघातही आशिष शेलार यांनी केला.

जेएनयू येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात पडले. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये काही विद्यार्थ्यांनी गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करुन या घटनेचा विरोध केला. या आंदोलनात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. या आंदोलना दरम्यान प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आव्हाड यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली होती. याच टीकेला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता जवाहरलाल नेहरु विद्यालयातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत आहेत. जेव्हा विचारसरणी किंवा बुद्धिमतेला सरकार घाबरतं तेव्हा देशात अराजकता येण्याची शक्यता असते’, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. त्याचबरोबर दिल्लीत कुणाचे पोलीस आहेत? असा सवाल करत आव्हाड यांनी केंद्र सरकारला दोषी ठरवलं होतं.

दरम्यान, जेएनयूच्या हिंसाचाराची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील 26/11 हल्ल्याशी तुलना केली. यावर देखील आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘मुख्यमंत्र्यांचं हे विधान निंदनीय आहे. ज्या अधिकाऱ्यांनी आत्मबलिदान दिलं त्यांचा अपमान करण्यासारखं आहे.ज्या शूरवीरांनी हा हल्ला परतवला त्यांचा अपमान करण्यासारखं होतं’, असं आशिष शेलार म्हणाले.