विधानसभेच्या 288 जागांबद्दल भाजपमध्ये काय घडतंय?, लवकरच जागावाटप?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेची रणनिती आखण्यात आली. या बैठकीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Assembly Election 2024 BJP Meeting : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. अनेक ठिकाणी पक्ष नेतृत्वांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौरे पार पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पक्षांतर्गत बैठकींचे सत्रही सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेची रणनिती आखण्यात आली.
बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा
विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार झाली. भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला भूपेंद्र यादव, विनोद तावडे उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणूक, जागावाटप, जागांची निवड यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, त्याबद्दल माहिती दिली.
15 दिवसात कार्यक्रम
राज्यात भाजपचे जिल्हा विस्तारित कार्यकारी अधिवेशन लवकरच पार पडले. आगामी निवडणुका समोर ठेवून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येईल. त्यासोबतच प्रत्येक विधानसभा निहाय अधिवेशनही पार पडले. राज्यातील 288 जागांवर, मंडल युनिटवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर योजना सुरु केल्या जातील. येत्या 15 दिवसात हा कार्यक्रम नियोजित करण्यात येईल, असे आशिष शेलार यांनी म्हटले.
लवकरच जागावाटपाची चर्चा
त्यासोबतच जागा निश्चित करणे, आता सुरु करायला हवे. त्याचा फॉर्म्युला निकष, जागांची वाटप, त्याची निश्चिती केली आहे. लवकरच त्याचे वाटप होईल. त्यासोबतच लवकरच जागावाटपाची चर्चा सुरु होईल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते निवडणुकांच्या पुढच्या प्लॅनबद्दल भाष्य करतील. महादेव जानकर यांनी केलेल्या जागेच्या मागणीवर मी काहीही बोलणार नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्यांच्याशी बोलतील, असेही आशिष शेलार यांनी म्हटले.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता. लोकसभेच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीने संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या भाजपकडून पक्षातील जुने, माजी पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.
