युतीच्या मंत्र्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांनाही कोर्टात खेचणार : हितेंद्र ठाकूर

युतीच्या मंत्र्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांनाही कोर्टात खेचणार : हितेंद्र ठाकूर

पालघर : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी शिट्टी चिन्ह मिळवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पालघर निवडणूक अधिकाऱ्यांसमोर या सर्व नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. सायंकाळी 6 वाजेपर्यंत अपक्ष उमेदवारांना मिळणारं चिन्ह रात्री अखेर साडेबारा वाजता मिळालं. पण यानंतर हितेंद्र ठाकूर आणि निवडणूक अधिकाऱ्यांसह मंत्र्यांवरही भडकले आहेत.

हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर सडकून टीका केली. केवळ चिन्हासाठी शिवसेना-भाजपच्या मंत्र्यांनी घाणेरडं राजकारण केलं असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला शिट्टी ऐवजी आटो रिक्षा हे चिन्ह मिळालंय. पण हीच रिक्षा आम्ही प्रत्येक मतदारांच्या घराघरापर्यंत पोहोचविणार आणि आमचा उमेदवार निवडून आणणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आम्हाला शिट्टी हे चिन्ह न मिळण्यासाठी भाजप-शिवसेनेने सत्तेचा पूर्ण गैरफायदा उचलून निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकला. रात्री साडे बारापर्यंत चिन्हाचं वाटप होऊ दिलं नाही. हा निवडणुकीतील घाणेरडा प्रकार आहे. केवळ मंत्र्याच्या दबावावर काम करणाऱ्या निवडणूक यंत्रणेसह मंत्र्याना मी सुप्रीम कोर्टात खेचणार आहे, असा इशाराही हितेंद्र ठाकूर यांनी दिला. आता साहेबांची शिवसेना राहिली नाही, साहेबांच्या शिवसेनेत एक दबाव होता, शब्दाला महत्व होतं, पण आता तसे राहिले नाही. केवळ दाढी वाढवून धर्मवीर होता येत नसल्याचा टोला शिवसेना आणि त्यांचे मंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकूर यांनी लगावला.

दरम्यान, पालघरचे युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी जो निकाल दिला, तो कायद्यात बसवून दिला. यात आमच्या मंत्र्यांनी कोणताही दबाव वापरला नाही. एखाद्या उमेदवारावर अन्याय होत असेल तर त्याला मदत करणंही काम असतं आणि त्यासाठीच आमचे मंत्री तेथे असल्याचं भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी सांगून ठाकूर यांनी केलेले आरोप खोडून काढले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI