मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, बीडमध्ये शिवसेना कार्यकर्तीकडून शाईफेक

| Updated on: Dec 31, 2019 | 10:16 AM

गेल्या आठवड्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मुंबईतील हिरामणी तिवारी यांना मारहाण करुन त्यांचं मुंडण करण्यात आलं होतं.

मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, बीडमध्ये शिवसेना कार्यकर्तीकडून शाईफेक
Follow us on

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लेखन करणाऱ्यांना दमदाटी करण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. बीड पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुनील कुलकर्णी यांच्यावर शिवसैनिकांकडून शाईफेक करण्यात आली. (Beed Shivsena Workers threw ink)

सुनील कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लेखन केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या बीडमधील शिवसैनिकांनी त्यांना गाठलं. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांनी पंचायत समितीमध्ये जाऊन सुनिल कुलकर्णी यांना जाब विचारला. त्यानंतर त्यांच्यावर बाटलीतून शाई ओतून घटनेचा निषेध करण्यात आला. या प्रकरणी आरोपींवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या आठवड्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मुंबईतील हिरामणी तिवारी यांना मारहाण करुन त्यांचं मुंडण करण्यात आलं होतं. या प्रकरणी चार शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. समाधान जुगधर, प्रकाश हसबे, श्रीकांत यादव आणि सत्यवान कोळंबेकर यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने शिवसैनिकांनी हिरामणी तिवारी यांचे केस कापून चक्क टक्कल करत, अवहेलना केली होती. रविवार 22 डिसेंबरला दुपारी ही घटना घडली होती.

हिरामणी तिवारी वडाळ्यातील रहिवाशी आहेत. हिरामणी यांची फेसबुक पोस्ट वाचून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी थेट त्यांच्या घराकडे कूच केली. इतकंच नाही तर हिरामणी यांना मारहाण करुन, त्याचे केस कापले.

उद्धव ठाकरे यांनी जामिया विद्यापीठातील मारहाणीची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्याविरोधात हिरामणी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. मुंडण आणि मारहाणीच्या प्रकारानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना 149 ची नोटीस पाठवली होती.

हिरामणी तिवारी हे बजरंग दल, विश्वहिंदू परिषद यांचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जातं. दादरमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमाला हिरामणी तिवारींनी हजेरी लावली होती.

Beed Shivsena Workers threw ink