भविष्यात काहीही होऊ शकतं, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचं मोठं विधान; संकेत कशाचे?

| Updated on: Mar 23, 2023 | 12:26 PM

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मनसे आणि शिवसेना युतीचे संकेत दिले आहेत. भविष्यात काहीही होऊ शकतं असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

भविष्यात काहीही होऊ शकतं, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचं मोठं विधान; संकेत कशाचे?
bharat gogawale
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मोठं विधान केलं आहे. मनसे आणि शिंदे गटाची युती होणार आहे का? असा सवाल शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांना करण्यात आला. त्यावर गोगावले यांनीही थेट उत्तर दिलं आहे. राजकारणात आणि खेळात कधी काय होईल सांगता येत नाही. पण आजही काही सांगता येत नाही. पण भविष्यात काहीही घडू शकतं, असे सूचक संकेत भरत गोगावले यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यात शिंदे गट आणि मनसे युती होणार का? याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेने त्याची तयारी सुरू केली आहे. त्यावरही भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. येत्या 6 ते 10 एप्रिलच्या दरम्यान अयोध्येचा दौरा आहे. 6 तारखेला हनुमान जयंती आहे. त्यामुळे या चार दिवसात दौरा होईल. आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून फायनल तारीख ठरवू, असं भरत गोगावले यांनी सांगितलं. अयोध्येला सर्वांना घेऊन जाणार आहे. धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर प्रभू रामाचं दर्शन घ्यायचं असं ठरलं होतं. धनुष्यबाण मिळाल्यानंतर साहेबांचा काही नवस असू शकतो तोही फेडू. अयोध्येला जायचं ठरलं होतं. तिकडे जात आहोत. साहेब जे बोलत होते. त्या गोष्टी पूर्ण होत आहेत. म्हणून आम्ही जात आहोत, असं गोगावले यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

धनुष्यबाण पेलणार

धनुष्यबाण पेलण्याचा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला होता. त्यावरही गोगावले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे यांनी सांगितलं ते बरोबर आहे. आम्ही तर धनुष्यबाण पेलण्याचा प्रयत्न करत आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही जातोय. विचार घेऊन जात आहोत तर धनुष्यबाण पेलायला काहीच अडचण नाही. जर विचारांची फारकत घेतली तर धनुष्यबाण आम्हाला पेलवणार नाही. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतली त्यांना धनुष्यबाण पेलवलं नाही, हा त्यातील अर्थ आहे. पण आम्ही फारकत घेणार नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालू, असं त्यांनी सांगितलं.

म्हणून लोक सोडून गेले

नारायण राणे यांना शिवसेना सोडायची नव्हती. पण काही लोकांमुळे त्यांना जावं लागलं, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी कालच्या सभेत केला. त्यावरही गोगावले यांनी सहमती दर्शवली. वस्तुस्थिती आहे. राज ठाकरे यांनी जे मांडलं त्याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या अत्यंत जवळचे होते.

राज साहेब कधी कधी साहेबांचा सल्ला घ्यायचे. पण पक्षात आजूबाजूला काही लोक असतात. त्यांनी उद्धव ठाकरे यांना भडकवलं. राज ठाकरे पुढे जातील. तुम्ही मागे पडाल असं सांगितलं. त्यामुळे राज ठाकरे यांना पक्ष सोडावा लागला. तेच नारायण राणे यांचं झालं. जे नेते मोठे होतात त्यांना अधिक प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण अमूक वाढला तर तुमचं महत्त्व कमी होईल, तमुक वाढला तर तुमचं महत्त्व कमी होईल, असं सांगितलं गेलं. त्यामुळे चार पाच लोक पक्ष सोडून गेले, असंही त्यांनी स्पष्ट केलं.