युतीत शिवसेनेच्या वाट्याच्या जागेवर भाजपचा दावा

नागपुरातील रामटेकच्या (Ramtek) जागेची शिवसेना-भाजपमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या रामटेकच्या जागेवर भाजपने (Shivsena BJP) दावा सांगितला आहे.

युतीत शिवसेनेच्या वाट्याच्या जागेवर भाजपचा दावा
अनिश बेंद्रे

|

Sep 12, 2019 | 9:21 AM

नागपूर : विधानसभा निवडणुकांचं बिगुल (Maharashtra Assembly Election) कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेना आणि भाजपमध्ये (Shivsena BJP) जागावाटपावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. नागपुरातील रामटेकच्या (Ramtek) जागेची सेना-भाजपमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या रामटेकच्या जागेवर भाजपने (Shivsena BJP) दावा सांगितला आहे.

विद्यमान आमदार भाजपचा असल्यामुळे रामटेक आणि काटोलची जागा भाजप लढवणार, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. रामटेकमध्ये द्वारम रेड्डी हे भाजप आमदार आहेत. युतीमध्ये रामटेकची जागा शिवसेनेच्या वाट्याला येते, परंतु 2014 मधील निवडणुकीत वेगवेगळे लढल्यानंतर रामटेकमध्ये कमळ फुललं होतं.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या कृपाल तुमाणे यांनी बाजी मारली होती. 1999 पासून शिवसेनेचे आशिष जयस्वाल सलग तीन वेळा आमदारपदी निवडून आले होते. परंतु 2014 मध्ये रेड्डींनी जयस्वाल यांना पराभवाची धूळ चारली. खासदार शिवसेनेचा असल्यामुळे साहजिकच शिवसेनेला विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असेल, असं मानलं जातं. मात्र, भाजपच्या घोषणेवर शिवसेनेची प्रतिक्रिया काय असणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

रामटेक हा नागपूरचा ग्रामीण भाग आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे.

दुसरीकडे, काटोलचे आमदार असलेल्या आशिष देशमुख यांनी भाजपविरोधात असंतोष व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला होता. माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे पुत्र असलेल्या आशिष यांनी भाजप सोडल्यानंतर काँग्रेसचा झेंडा हाती धरला. त्यामुळे काटोलच्या जागेवरही दावा सांगत या दोन्ही जागा भाजपच लढवेल, असं बावनकुळेंनी जाहीर केलं.

काटोल हा सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र 2014 मध्ये भाजपच्या तिकीटावर लढलेल्या आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला. आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांना 5 हजार 557 मतांनी पराभूत केलं होतं. आता काँग्रेसवासी झालेले देशमुख विजयी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

युतीच्या फॉर्म्युलामध्ये जवळपास 22 ते 25 जागांची अदलाबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी  आणि काँग्रेसचे जे विद्यमान आमदार भाजप-शिवसेनेमध्ये आले आहेत, त्यांच्या जागांबाबत ही अदलाबदल होईल.

भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार काही ठिकाणी शिवसेनेची ताकद कमी (Shivsena BJP) झाली आहे. या जागा घेण्यासाठी भाजप उत्सुक असल्याचंही सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे भाजप-शिवसेनेत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना काही पारंपरिक जागांचीही अदलाबदल होणार आहे.

अदलाबदल होणाऱ्या जागांमध्ये मुंबईच्या 4 ते 5 जागांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अंतिम जागावाटपांचं सूत्र काय ठरणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

अदलाबदल होणाऱ्या संभाव्य जागा

काँग्रेसचे कालिदास कोळंबकर भाजपमध्ये गेल्याने शिवसेनेला हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात सोडावा लागणार आहे. त्याजागेवर शिवसेना भाजपचा मुंबईतील इतर दुसरा मतदारसंघ घेऊ शकते. शिवसेनेकडून वडाळ्याऐवजी गोरेगाव मतदारसंघाची मागणी होण्याची शक्यता अधिक आहे. गोरेगावमध्ये विद्या ठाकूर या भाजप आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या सुभाष देसाई यांचा पराभव केला होता.

सिल्लोड विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे. मात्र, या मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनच्या वाट्याला येणार आहे. दुसरीकडे उस्मानाबादमध्ये राणा जगजीतसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करताना भाजपकडून या जागांची मागणी होईल. त्यामुळे भाजप-शिवसेनेत या सर्व जागांची अदलाबदल निश्चित मानली जात आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें