‘मुख्यमंत्र्यांकडे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी वेळ नाही, पक्षवाढीसाठी मात्र बैठका’, भाजपचा जोरदार टोला

| Updated on: Jul 08, 2021 | 7:53 PM

मुख्यमंत्र्यांकडे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी वेळ नाही. मात्र, पक्षवाढीसाठी बैठकांवर बैठका घेत आहेत, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीय.

मुख्यमंत्र्यांकडे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी वेळ नाही, पक्षवाढीसाठी मात्र बैठका, भाजपचा जोरदार टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप आमदार अतुल भातखळकर
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ‘शिवसंपर्क’ मोहीमेची घोषणा करण्यात आली. त्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावलाय. मुख्यमंत्र्यांकडे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी वेळ नाही. मात्र, पक्षवाढीसाठी बैठकांवर बैठका घेत आहेत, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीय. (Atul Bhatkhalkar’s criticism on CM Uddhav Thackeray and Shiv Sena’s Shiv Sampark campaign)

ओ माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राची चिंता करा. शेतकऱ्यांची चिंता करा. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकाची चिंता करा. तुम्ही मुख्यमंत्री आहात. युती-आघाड्यांची चिंता करु नका. ते जनता बघेल, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांकडे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी वेळ नाही. मात्र, पक्षवाढीसाठी बैठकांवर बैठका घेत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

कशी असेल शिवसेनेची ‘शिवसंपर्क’ मोहीम?

येत्या सोमवारपासून म्हणजे 12 जुलैपासून राज्यभर ही मोहीम राबवली जाणार आहे. तसेच शाखाप्रमुखांना प्रत्येक घराघरात जाऊन लोकांनी लस घेतली की नाही याची माहिती घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची संवाद यात्रा सुरू असतानाच आता शिवसेनेनेही शिवसंपर्क मोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेसन आणि भाजपनेही जनमत आपल्याकडे वळवण्यासाठी आंदोलनांचा आधार घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या शिवसंपर्क मोहिमेला अधिक महत्त्व आलं आहे.

जिल्हा प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी येत्या 12 ते 24 जुलैपर्यंत शिवसंपर्क मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. या मोहिमेअंतर्गत “माझं गाव, करोना मुक्त गाव” करण्यासाठी शाखाप्रमुखांनी प्रत्येक घराघरात जाऊन लसीकरण झालं की नाही याची माहिती घ्यावी. इतर काही अडचणी आहेत का? विकासात्मक योजना त्यांच्या पर्यंत पोहचत आहेत की नाही, याचीही माहीती घ्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सांगितलं जातं.

संबंधित बातम्या :

‘पुणे महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तयारीला लागा’, संजय राऊतांचा कार्यकर्त्यांना आदेश

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास योजना कुणासाठी? मुंबई लोकल कधी सुरु? आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले?