अजित पवार आणि संजय काकडेंच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

अजित पवार आणि संजय काकडेंच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

पुणे : भाजपचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पक्षाविरोधात बंड जवळपास जाहीर केलंय. कारण, आधी काँग्रेससोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादीसोबत लोकसभा निवडणूक लढण्यासाठी चर्चा सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची संजय काकडेंनी भेट घेतली आणि लोकसभेसाठी पाठिंबा देण्याची मागणी केल्याची माहिती आहे. पण ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येते असं म्हणत अजित पवार यांनी हात वर केले आहेत.

अजित पवारांनी संजय काकडेंचा भ्रमनिरास केल्याचं दिसतंय. कारण, आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस देईल त्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. अपक्ष उमेदवार निवडून आणणं अशक्य असल्याचंही अजित पवारांनी संजय काकडेंना सांगितलं.

दरम्यान, संजय काकडेंनी भाजपविरोधात जाहीर बंड केलंय. भाजपने आतापर्यंत माझा वापर करुन घेतल्याचं ते म्हणाले. मध्यंतरी मी भ्रमिष्ट झालो होतो आणि त्यामुळेच भाजपने माझा वापर करुन घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी भावासारखे आहोत. पण भावाने लाथ मारल्यानंतर नवं घर शोधावं लागतं, असं म्हणत त्यांनी भाजपच्याच विरोधात बंड करणार असल्याचं जाहीर केलंय. पुण्यात अजित दादांचं मोठं वजन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात मोठं योगदान असल्याने मी अजित पवारांना भेटलो, असं ते म्हणाले.

संजय काकडे हे भाजपच्या मदतीने राज्यसभेवर निवडून गेले आहेत. पण त्यांचं सध्या भाजपशी जमत नाही. त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली होती. पण काँग्रेसकडून पुण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुढे केल्याचं बोललं जातंय.

वाचाकाँग्रेसचा शोध संपला, पृथ्वीराज चव्हाणांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी?

संजय काकडे आणि भाजप यांच्यातील ताणलेले संबंध गेल्या काही दिवसांपासून लपून राहिलेले नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात तर काकडेंनी जाहीर टीका केली होती. युती न झाल्यास जालन्यातून रावसाहेब दानवेंचा पराभव निश्चित असल्याचं ते म्हणाले होते.

वाचापुणे लोकसभा : आघाडीची तयारी, भाजप पिछाडीवर असल्याचं चित्र

संजय काकडेंनी यापूर्वी अनेकदा भाजपच्या पराभवाचे आकडेही जाहीरपणे सांगितले होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेले मूळ मुद्दे बाजूला राहिलेले असून राम मंदिरासारखे मुद्दे मध्ये आल्यानेच पराभव झाल्याचं ते म्हणाले होते.

Published On - 5:48 pm, Mon, 11 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI