मोठी बातमी ! अखेर खाते वाटप जाहीर, अजित पवार यांना कोणतं खातं?; कुणाला कोणतं खातं मिळालं पाहा संपूर्ण यादी

| Updated on: Jul 14, 2023 | 4:14 PM

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर ते तडक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटले.

मोठी बातमी ! अखेर खाते वाटप जाहीर, अजित पवार यांना कोणतं खातं?; कुणाला कोणतं खातं मिळालं पाहा संपूर्ण यादी
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून खाते वाटपावरून गोंधळ सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर या गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीला खाते देण्यावरून शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जुंपली होती. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला होता. मात्र, आता खाते वाटपाचा तिढा सुटला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाकडील कृषी खातं आपल्याकडे खेचून आणण्यात यश आलं आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी तीन दिवस मध्यरात्री बैठका पार पडल्या. त्यात खाते वाटपावर चर्चा करण्यात आली. मात्र, त्यातून तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अजित पवार यांना अर्थ खातं न देण्याचा आमदारांचा दबाव होता. ज्या कारणासाठी महाविकास आघाडीतून आणि शिवसेनेतून बाहेर पडलो, तेच खातं आता अजित पवार यांना जाणार असेल तर मतदारसंघात मतदारांना काय उत्तर द्यायचं? असा सवाल या आमदारांकडून केला जात होता. त्यामुळे अजित पवार यांना अर्थ खातं देऊच नये, असा तगादा आमदारांनी लावल्याने खाते वाटपाचा तिढा काही सुटता सुटत नव्हता.

हे सुद्धा वाचा

शहांकडे यशस्वी तोडगा

त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा खाते वाटपाचा तिढा सुटला. अर्थ खातं आपल्याकडे घेण्यास अजित पवार यशस्वी ठरले. इतकेच नाही तर त्यांनी शिंदे गटाकडील कृषी खातंही आपल्याकडे वळतं करून घेतलं आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. कृषी खातं राष्ट्रवादीला गेल्याने अब्दुल सत्तार यांची पंचाईत झाली आहे.

राष्ट्रवादीला मिळालेली खाती

अजित पवार – अर्थ, नियोजन

छगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण

धर्मरावबाबा अत्राम- औषध व प्रशासन

दिलीप वळसे पाटील – सहकार

धनंजय मुंडे – कृषी

हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

अनिल पाटील – मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन

आदिती तटकरे- महिला आणि बालकल्याण

संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

शिरसाट यांच्या गाठीभेटी

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडीने दुपारी राजभवनात जाऊन राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बैस यांना मंत्र्यांच्या खाते वाटपाची यादी दिली. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर ते तडक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटले. शिरसाट यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याने त्यांच्या गाठीभेटी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.