चंद्रपुरात महापौर निवडीचे वेध, सलग चौथ्यांदा मनपावर महिलाराज

| Updated on: Nov 15, 2019 | 7:58 AM

राज्यातील एकूण 27 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीचे आरक्षण नगर विकास मंत्रालयात नुकतेच काढण्यात आले (Chandrapur Mayor Elections). यात चंद्रपूर मनपासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

चंद्रपुरात महापौर निवडीचे वेध, सलग चौथ्यांदा मनपावर महिलाराज
Follow us on

चंद्रपूर : राज्यातील एकूण 27 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीचे आरक्षण नगर विकास मंत्रालयात नुकतेच काढण्यात आले (Chandrapur Mayor Elections). यात चंद्रपूर मनपासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या मनपात भाजपची बहुमताची सत्ता असल्याने पक्षातील इच्छुक उमेदवार आपलीच निवड व्हावी यासाठी सक्रिय झाले आहेत (Chandrapur Mayor Elections).

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या (Chandrapur Municipal Corporation) गठनानंतर सलग चौथ्यांदा महापौरपदासाठी महिलेची निवड होणार आहे (Female Mayor). यापूर्वी काँग्रेसच्या संगीता अमृतकर, भाजपच्या राखी कंचर्लावार, विद्यमान महापौर अंजली घोटेकर यांनी महापौर पद सांभाळलं. त्यानंतर आता पुन्हा खुल्या प्रवर्गातील महिलासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आल्याने मनपातील पुरुष नगरसेवकांची पंचाईत झाली आहे. याबाबत काही नाराज नगरसेवकांनी फेसबुकच्या माध्यमातून खंत देखील व्यक्त केली. मात्र, आता पुढच्या आठ दिवसात महिला महापौर पुन्हा एकदा चंद्रपूर मनपाचा कारभार सांभाळणार आहे.

बहुमताची सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षातील नगरसेवक यासाठी सक्रिय झाले आहेत. या पदासाठी माजी महापौर राखी कंचर्लावार यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना असलेला महापौरपदाचा अनुभव आणि मनपातील सत्ता सांभाळण्याची क्षमता यामुळे त्यांची वर्णी या पदावर लागू शकते. यावर आपण जनसेवेसाठी पुन्हा सज्ज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, भाजप पक्षश्रेष्ठींनी या पदासाठी आता आपली निवड करावी, अशी इच्छा महापौरपदाच्या दुसऱ्या इच्छुक उमेदवार अनुराधा हजारे यांनी व्यक्त केली. आपल्याला संधी दिल्यास शहर विकासाचा वेग वाढवणार, असं त्यांनी सांगितलं. मात्र, पक्ष श्रेष्ठी जो आदेश देतील तो पाळणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

गेली पंधरा वर्षे भाजपसाठी प्रामाणिक कार्यकर्त्या म्हणून काम करत असलेल्या माया उइके यांनी देखील महापौरपदासाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे. श्रेष्ठींनी संधी दिल्यास शहर विकासासाठी पूर्ण शक्तीनिशी कार्यरत राहू, असं त्यांनी सांगितलं.

चंद्रपूर शहर मनपात भाजपचे बहुमताचे संख्याबळ असल्याने पक्षाला महापौर निवडून आणणे तुलनेने सोपे जाणार आहे. मात्र, चंद्रपूर लोकसभा आणि विधानसभा पराभवानंतर भाजप प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत आहे.