
Ajit Pawar Vs Chandrarao Taware : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यंमंत्री अजित पवार आणि सहकार बचाव पॅनल प्रमुख चंद्रराव तावरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. 85 वर्षे झाली तरी थांबायला तयार नाही, असं अजित पवार चंद्रराव तावरे यांना उद्देशून म्हणाले होते. त्यानंतर आता अजित पवार यांच्या याच विधानाचा समाचार चंद्रराव तावरे यांनी घेतला आहे. मी 100 वर्षे जगणार आहे. तोपर्यंत मी निवडणूक लढवणार आहे, असं चंद्रराव यांनी म्हटलंय.
अजित पवार यांचा कारखान्याचा अनुभव 25 वर्षे आहे. तर या क्षेत्रात माझा अनुभव हा 65 वर्षांचा आहे. मी अनावधानाने 111 कोटी रुपये बोलून गेलो होतो. याचा अर्थ मला विस्मरण झालं असा होत नाही. परमेश्वर मला 100 वर्षे आयुष्य देणार आहे. तोपर्यंत मी निवडणूक लढणार आहे, असा पलटवार चंद्रराव तावरे यांनी केला.
चंद्रराव तावरे यांच्यावर टीका करताना हे बाबा 85 वर्षे झाले तरी थांबायला तयार नाहीत. आता त्यांना पयजामा सोडलाय आणि लुंगी घालायला सुरुवात केली, अशी खिल्ली अजित पवार यांनी उडवली होती. त्याला उत्तर म्हणून माझा अपघात झाला होता. माझा गुडघ्याचा बॉल बदलला आहे. मला पाय वळवता येत नसल्याने पायजमा घालता येत नाही. त्यामुळे मी लुंगी घालतोय. आता काय मी उघडा फिरू का? असा सवालही चंद्रराव तावरे यांनी अजितदादांना केलाय.
माळेगाव कारखाना निवडणुकीत आम्ही शरद पवार पक्षाला सांगितलं, की आम्हांला तुमच्या बरोबर युती करता येणार नाही. कारण ही बाब नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना आवडली नसती. माळेगाव कारखान्यात ज्यास्त पैसे मिळणार म्हणून अजित पवार चेअरमन व्हायला निघाले आहेत, असा आरोपही तावरे यांनी केला.
कायदाने चेअरमन होता येतं का यासाठी अजित पवार यांनी वकिलांची मीटिंग घेतली होती. तर त्यात वकिलांनी सांगितलं की होता चेअरमन होता येत नाही. त्यावर अजित पवार म्हणाले की सहकार खाते माझ्याकडे आहे मी कायदा बदलेल. म्हणजे आपल्या चेअरमनपदासाठी उभ्या महाराष्ट्र राज्याचा कायदा बदलायला अजित पवार निघालेत, असा आरोपही चंद्रराव तावरे यांनी केला.
विरोधक म्हणतात अजित पवार यांचे 14 कारखाने आहेत. या टीकेवर अजित पवार म्हणाले माझे 14 कारखाने आहेत तर त्यातले 10 कारखाने देऊन टाकतो. यावर चंद्रराव तावरे म्हणाले यांना सरकारमध्ये राहायचे आहे. त्यांना एवढी संपत्ती ठेवता येत नाही. इंदापूरमध्ये त्यांची जगताप व्यक्तीच्या नावावर वायनरी आहे हे कालच अजित पवार यांनी कबूल केलंय, असा गौप्यस्फोटही तावरे यांनी केला.