राष्ट्रवादीचा महिला चेहरा बनलेल्या चित्रा वाघ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष कशा झाल्या? जाणून घ्या वाघ यांचा संपूर्ण राजकीय प्रवास

महिला सुरक्षा, महिला सशक्तीकरण आणि सबलीकरणावर रोखठोक आणि तितक्याच आक्रमक भूमिका मांडणारा हा चेहरा दुसरा तिसरा कुणी नाही तर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वाघ यांनी आपला मूळ बाणा सोडलेला नाही.

राष्ट्रवादीचा महिला चेहरा बनलेल्या चित्रा वाघ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष कशा झाल्या? जाणून घ्या वाघ यांचा संपूर्ण राजकीय प्रवास
भाजप नेत्या चित्रा वाघ

सागर जोशी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : 2014 नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक आक्रमक महिला नेतृत्व उदयाला आलं होतं. विविध आंदोलनं आणि टीव्हीवरील चर्चासत्रातील पक्षाची भूमिका जोरकरपणे मांडणारा चेहरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. महिला सुरक्षा, महिला सशक्तीकरण आणि सबलीकरणावर रोखठोक आणि तितक्याच आक्रमक भूमिका मांडणारा हा चेहरा दुसरा तिसरा कुणी नाही तर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वाघ यांनी आपला मूळ बाणा सोडलेला नाही. वाघ यांच्या आक्रमकतेपुढे महाविकास आघाडी सरकारला नमतं घ्यावं लागल्याचं चित्र संपूर्ण राज्यानं पाहिलं आहे. (Political journey of BJP leader Chitra Wagh)

अशावेळी तब्बल 20 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतलेल्या चित्रा वाघ अचानक भाजपवासी कशा झाल्या? 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघ यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? त्यांचा राजकीय प्रवास आपण जाणून घेणार आहोत.

चित्रा वाघ यांचा राजकीय प्रवास

चित्रा वाघ यांनी जवळपास 20 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम केलं आहे. सुरुवातीला त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागाच्या महिला अध्यक्षा राहिल्या आहेत. तिथूनच त्यांचं नाव चर्चेत येण्यास सुरुवात झाली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये जोरदार काम केलं आहे. राज्यात आघाडी सरकार असताना चित्रा वाघ यांच्याकडे महिला आयोगाच्या सदस्यपदाची जबाबदारीही होती.

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर चित्रा वाघ यांची अनेक आंदोलनं गाजली. त्यांचा आक्रमक पवित्रा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांनी पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडण्यासोबतच राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसला आक्रमक स्वरुप प्राप्त करुन दिलं. महिलाच्या प्रश्नांवर लढणारी महिला नेता म्हणून चित्रा वाघ यांनी ओळख बनली.

2019 पर्यंत चित्रा वाघ या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेशही चांगलाच चर्चेत आला होता.

पती किशोर वाघ यांची चौकशी टाळण्यासाठी भाजपप्रवेश केल्याची चर्चा

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना एका प्रकरणात चार लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोपाखाली मुंबईतील गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीत अभिलेख ग्रंथपाल या पदावरुन निलंबित करण्यात आलं होतं. तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांची चौकशीही लावण्यात आली होती. आपल्या पतीची चौकशी टाळण्यासाठीच चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान, किशोर वाघ हे निर्दोष आहेत आणि संबंधित रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे त्यांचं नाव या प्रकरणात आल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केलाय.

युती सरकारच्या काळात 2016 ते 2019 दरम्यान आपण सरकारविरोधात अनेक आंदोलनं केली. जर चौकशीला घाबरुन घरी बसायचं होतं तर तेव्हाच बसले असते किंवा तेव्हाच भाजपमध्ये प्रवेश केला असता, असा युक्तीवाद चित्रा वाघ यांनी केला होता. मात्र, 2019 मध्ये भादपमध्ये प्रवेश करण्याची कारणं वेगळी होती. महत्वाची बाब म्हणजे शरद पवार यांना त्या सर्व कारणांची कल्पना आहे, असा दावाही चित्रा वाघ करतात.

असं असलं तरी महाविकास आघाडीविरोधात रान पेटवणाऱ्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात 12 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे किशोर वाघ यांच्याकडील 90 टक्के संपत्तीचा हिशेब नसल्याचं सांगण्यात येत आहे.

शरद पवारांबद्दल नितांत आदर

’20 वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं. पवार साहेब असो की दादा सर्वांनी मला प्रेम दिलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही माझ्यावर मनापासून प्रेम केलं’, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यावर केलं होतं. आम्ही साहेबांच्या तालमीत तयार झालो आहोत. पक्ष सोडला असला तरी शरद पवार यांच्यावरील प्रेम आणि श्रद्धा कायम असेल, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्याच्या कडा पानावल्या होत्या.

27 फेब्रुवारी 2021 रोजी चित्रा वाघ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार साहेबांची आठवण येत असल्याचं म्हटलंय. 2017 मध्ये जेव्हा माझ्या पतीवर पहिली एफआयआर दाखल झाली तेव्हा पवारांनी मला बोलावून घेतलं. तो बापच आहे माझा. त्यांना मी ती कॉपी दाखवली. ते म्हणाले चित्रा यात तुझ्या नवऱ्याचं नावंच नाही, असं पवार साहेब म्हणाल्याचं वाघ यांनी सांगितलं होतं.

संजय राठोडांना घरी बसवलं

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणात चित्रा वाघ यांनी संजय राठोडांचा पिच्छा पुरवला होता. फेब्रुवारीच्या सुरुवातीला पूजा चव्हाण प्रकरण समोर आल्यानंतर संजय राठोड यांचं नाव दबक्या आवाजात घेतलं जात होतं. त्यावेळी पहिल्यांदा चित्रा वाघ यांनी राठोडांचं नाव जाहीरपणे घेतलं. इतकंच नाही तर राठोडांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली होती.

त्यानंतर चित्रा वाघ यांनी या संपूर्ण प्रकरणाचा जोरकसपणे पाठपुरावा केला. राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पूजाचे नातेवाईक पुढे येत नसल्यामुळे पोलिसांनी स्यू मोटो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावेळी चित्रा वाघ यांना धमक्यांचेही फोन आले, तशी माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली होती.

चित्रा वाघ यांचा पाठपुरावा, पत्रकार परिषदेतील गंभीर आरोप, पुणे पोलिसांना जाब विचारणं यासंह भाजपनं राठोडांविरोधात उठवलेलं रान, यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोडांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा लागला. (Political journey of BJP leader Chitra Wagh)

मेहबुब शेख प्रकरणातही आक्रमक भूमिका

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्कार आणि फसवणुकीचे आरोप केले आहेत. त्या प्रकरणातही चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. शिरुर कासार इथं जात चित्रा वाघ यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. दरम्यान, हे प्रकरण औरंगाबाद पोलिसांनी निकाली काढलं आहे. त्यानंतर आता मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल केलाय.

शेख यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर असे दिवसाला 100 गुन्हे दाखल करा. पण मी बोलत रहाणार.. लडेंगे..जितेंगे, असं प्रत्युत्तर वाघ यांनी मेहबुब शेख यांना दिलं आहे.

चित्रा वाघ यांच्यावरुन भाजपकडून दुहेरी जबाबदारी

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चित्रा वाघ यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. ती समर्थपणे सांभाळत वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला विविध प्रकरणात चांगलंच जेरीस आणण्याचं पाहायला मिळालं. महिलांवर होणारे अत्याचार, सरकारमधील मंत्री आणि नेत्यांकडून होणारं महिलांचं शोषण यावर वाघ यांनी आवाज उठवला. वाघ यांच्या आवाजाने राज्य सरकारचा अक्षरश: कानठाळ्या बसल्या. त्याचंच उदाहरण म्हणजे संजय राठोड प्रकरण.

पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळत असताना आता भाजपकडून त्यांच्यावर अजून एक जबाबदारी टाकली आहे. 30 जून रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक पत्रक काढून वाघ यांच्यावर भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून विशेष जबाबदारी दिली आहे. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते, असं म्हणत चित्रा वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस तसेच सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

इतर बातम्या :

चाकणकरांची सून म्हणून आली आणि राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष झाली! कसा आहे रुपाली चाकणकरांचा राजकीय प्रवास?

कोकणावर सातत्याने ओढावणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करणारी तरुण आणि खंबीर राजकारणी; आदिती तटकरेंचा राजकीय प्रवास

Political journey of BJP leader Chitra Wagh

Published On - 7:30 am, Sun, 8 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI