कब बाप मरेगा…और… ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर फडणवीसांची खास प्रतिक्रिया; काय म्हणाले?

राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा चालू आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

कब बाप मरेगा...और... ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर फडणवीसांची खास प्रतिक्रिया; काय म्हणाले?
devendra fadnavis and uddhav thackeray and raj thackeray
| Updated on: Jun 07, 2025 | 5:47 PM

Devendra Fadnavis : राज्यात सध्या मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील युतीची जोरदार चर्चा चालू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही युती अस्तित्त्वात आली तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र येतील. म्हणूनच या युतीला सध्या चांगलेच महत्त्व आले आहे. दरम्यान, याच युतीच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे बंधूनी एकत्र येण्याची इच्छा अनेकांनी केली व्यक्त

मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीसाठी दोन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते अनुकूल असल्याचे बोलले जातेय. विशेष म्हणजे ठाकरे गटातील काही महत्त्वाच्या नेत्यांनी आम्ही राज ठाकरेंशी युती करण्यासंदर्भात सकारात्मक आहोत, असं जाहीरपणे सांगून टाकलेलं आहे. तर दुसरीकडे मनसेच्याही काही नेत्यांनी ही युती झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी तर या दोन्हीही ठाकरे बंधूंचे एकमेकांकडे नंबर आहेत, त्यांनी बोललं पाहिजे, असं विधान अलीकडेच केलं आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला चांगेलच महत्त्व आले आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं. यावर बोलताना त्यांनी अगदी शेलक्या भाषेचा वापर करत प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही भावांच्या युतीची माध्यमांमध्ये जेवढी घाई दिसते आहे, तेवढी घाई ही दोन भावांमध्ये दिसत नाहीये. ‘कब बाप मरेगा, कब बैल बटेगा’, अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. युतीच्या चर्चेबाबत पतंगबाजी केली जात आहे. त्यावर मी प्रतिक्रिया कशी देऊ. माझ्याकडे फक्त एवढेच एक काम नाहीये, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

राहुल गांधींच्या आरोपांना दिले उत्तर

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत गफलत झालेली आहे, असा आरोप एका लेखाच्या माध्यमातून केला आहे. याच आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये आपले हार मानली आहे. मी नेहमी हे म्हणतो की जोपर्यंत राहुल गांधी जमिनीवर उतरणार नाहीत, तथ्य समजून घेणार नाहीत तोपर्यंत त्यांचा पक्ष जिंकणार नाही. ते स्वत:शीच खोटं बोलत आहेत. ते स्वत:ला दिलासा देत आहेत. त्यांनी जागं झालं पाहिजे. ते मतदारांचा अपमान करत आहेत. राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मतदातांचा जो अपमान केला त्याचा मी निषेध करतो, असंही फडणवीस यांनी म्हटलंय.