एकनाथ शिंदे रामलल्ला चरणी, सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार; शिंदे गटाची खेळी काय?

| Updated on: Oct 26, 2022 | 9:59 AM

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे अयोध्येला गेले होते. मात्र, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊन साडेतीन महिने होऊन गेले. शिवाय कोरोनाचं संकटही ओसरलेलं आहे.

एकनाथ शिंदे रामलल्ला चरणी, सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार; शिंदे गटाची खेळी काय?
एकनाथ शिंदे रामलल्ला चरणी, सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) लवकरच रामलल्ला चरणी नतमस्तक होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे आपल्या सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला (ayodhya) जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या दौऱ्याचं लवकरच नियोजन करण्यात येणार आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार असल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून शिंदे हिंदुत्वाचा (hindutva) मुद्दा हाती घेणार असल्याच्या चर्चाही या निमित्ताने रंगल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. महंतांचं हे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं होतं. त्यामुळे शिंदे हे अयोध्येला जाण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं जातं.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाचे सर्व मंत्री आणि आमदार यांनाही घेऊन ते अयोध्येला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. महापालिका निवडणुकीपूर्वीच हा दौरा होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाकडून हिंदू मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटानेही आपणच खरे हिंदुत्ववादी आहोत आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आपण पुढे घेऊन जात आहोत, हे दाखवण्यासाठी शिंदे गट अयोध्येला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे अयोध्येला गेले होते. मात्र, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊन साडेतीन महिने होऊन गेले. शिवाय कोरोनाचं संकटही ओसरलेलं आहे. असं असताना शिंदे अजून अयोध्येला गेलेले नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून या पार्श्वभूमीवर शिंदे हे अयोध्येला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.