Uddhav Thackeray : अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसले! मोठ्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांचा फोटो समोर

Uddhav Thackeray : अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसले! मोठ्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांचा फोटो समोर
जितेंद्र आव्हाडांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील उपस्थितीबाबत माहिती

अधिवेशनातील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन भाजप नेत्यांकडून मोठी टीका केली जातेय. त्या पार्श्वभूमीवर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Dec 23, 2021 | 9:30 PM

मुंबई : मंत्रिमंडळ बैठक (Cabinet Meeting), हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पूर्वसंध्येला आयोजित चहापान आणि हिवाळी अधिवेशन काळातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहिले नाहीत. अधिवेशनातील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन भाजप नेत्यांकडून मोठी टीका केली जातेय. त्या पार्श्वभूमीवर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सुरुवातीपासून या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित होते. ते ठणठणीत आहेत. त्यांनी प्रत्येक मंत्र्याशी संवाद साधला. कॅबिनेटमधील प्रत्येक विषयावर त्यांनी स्वत:चं मत मांडलं आणि सर्व पद्धतीनं ते शारिरिकदृष्य तंदुरुस्त आहेत. हे मी यासाठी सांगतो आहे की, संपूर्ण महाराष्ट्राला संभ्रमात टाकायचं, संपूर्ण महाराष्ट्रात एखादं प्रश्नचिन्ह निर्माण करायचं, ही विकृत कार्यपद्धती आता सगळ्यांनी सोडून द्यावी. कोण आजारी होतं, कोण तीन महिने कुठं होतं, या सगळ्या गोष्टी समजतात, काढता येतात. पण कुठल्याही माणसाच्या किमान आजारपणाबद्दल तरी बोलू नये ही आम्हाला शिकवली गेलेली संस्कृती आहे, संस्कार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठणठणीत आहेत, हे मी सांगण्यासाठी इथे आलो आहे. बाकीच्यांना जे काही करायचं आहे ते नेहमीप्रमाणे करु द्यात, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन वाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील 45 दिवसांपेक्षा अधिक काळापासून राज्याच्या कारभारात सक्रीय सहभागी नाहीत. त्यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते अद्यापही समोर आलेले नाहीत. मात्र, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकांमध्ये सहभागी होत असल्याचं सांगितलं जात होतं. पण त्याचा एखादा फोटो अद्याप समोर आला नव्हता. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांच्या कामकाजातही मुख्यमंत्री सहभागी झाले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कारभार आदित्य ठाकरे, आदित्य यांच्यावर विश्वास नसेल तर रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्याचा खोचक सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. पाटील यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

फडणवीसांचाही मुख्यमंत्र्यांना सल्ला

पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीबाबत देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला. तावर बोलताना ‘माननीय मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असेल आणि ते येत नाहीत म्हणून आक्षेप घेणं बरोबर नाही. तब्येत खराब असेल त्यामुळे ते आले नाहीत तरीही आम्ही अधिवेशन पार पाडू. आमचं म्हणणं एवढंच आहे की कामकाज व्हावं. आमचं सरकार असताना एखादा मंत्री आजारपणामुळे सभागृहात उपस्थित राहू शकला नाही तर आम्ही त्या खात्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे दिली होती. मुख्यमंत्र्यांनी जबाबदाऱ्यांचं वाटप करावं’, असा सल्ला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

इतर बातम्या : 

‘इथे भ्रष्टता, तिथे नष्टता… शंखच पोकळ फुंकू नका’, कुसुमाग्रजांच्या कवितेच्या सहाय्यानं फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

Omicron : चिंता वाढली; राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची उच्चांकी नोंद, दिवसभरात 23 नवे रुग्ण आढळले!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें