राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सहकार विभागाचा निर्णय

| Updated on: Feb 24, 2021 | 9:41 PM

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सहकार विभागाचा निर्णय
Follow us on

बारामती : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तशी माहिती सहकार विभागानं दिली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 क मधील तरतुदीनुसार राज्य सरकारला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.(Government decides to postpone elections of co-operative societies in the state)

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळोवेळी 18 मार्च 2020, 17 जून 2020 आणि 28 सप्टेंबर 2020 रोजीच्या आदेशानुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत, तर 16 जानेवारी 2021 रोजीच्या आदेशानुसार 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सरकारचा निर्णय

फेब्रुवारी 2021 मध्ये राज्यात कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढतेय. ही बाब लक्षात घेता कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी, तसंच राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सध्यस्थितीत पुढे सुरु ठेवणे उचित होणार नसल्याचं सरकारच्या लक्षात आलं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 157 मधील तरतुदीनुसार शासनास असलेल्या अधिकारात कलम 73 क मधील तरतुदीला सूट देवून, ज्या प्रकरणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा सहकारी संस्था तसेच 250 पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत.

निवडणुकांमध्ये नियमांचे काटेकोर पालन गरजेचे

ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाच्या कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. मात्र, 250 पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांबाबतचे नियम अंतिम झाल्यानंतरच सदर संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरु करण्यात यावा, असं सहकार मंत्रालयाने सूचित केलं आहे.

इतर बातम्या :

मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा वर्षभराचा प्रवास: सुधीर मुनगंटीवार

Navi Mumbai Municipal Election 2021 : नवी मुंबईत मतदारांची हेराफेरी, एका मतदाराचा भाव पाचशे रुपये!

Government decides to postpone elections of co-operative societies in the state