हा योगायोग नाही, महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांमुळेच मोदी सरकारकडून मेट्रो कामात आडकाठी, सचिन सावंतांचा हल्लाबोल

| Updated on: Nov 03, 2020 | 4:01 PM

काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई मेट्रोच्या कामात आडकाठी घातल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजप आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

हा योगायोग नाही, महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांमुळेच मोदी सरकारकडून मेट्रो कामात आडकाठी, सचिन सावंतांचा हल्लाबोल
Follow us on

मुंबई : काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई मेट्रोच्या कामात आडकाठी घातल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजप आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. मुंबई मेट्रोचं काम सुरु झालं असताना सॉल्ट डिपार्टमेंटला आठवण येणं हा योगायोग नाही. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांमुळेच मोदी सरकारने आडकाठी आणण्याची भूमिका घेतली आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला. तसेच कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जमीन राज्य सरकारचीच असल्याचं म्हटलं (Sachin Sawant criticize Maharashtra BJP over Mumbai Metro Work).

सचिन सावंत म्हणाले, “भाजप म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाच्या झारीतील कमळाचार्य आहे. या कमळाचार्याचा महाराष्ट्राच्या हितावर असलेला तिरका डोळा जनतेनेच फोडावा. महाविकासआघाडी सरकारच्या राज्य हिताच्या निर्णयांमध्ये भाजप आणि मोदी सरकार सातत्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. कांजूरमार्गची मेट्रो कारशेडची जमीन ही राज्याची आहे. जमिनीवर 1981 अगोदरपासून महाराष्ट्र शासनाचं नाव लागलेलं आहे. 2015 मध्ये ही जमीन विभागीय आयुक्तांनी सॉल्ट डिपार्टमेंटला दिल्याचे कोणतेही पुरावे देता आलेले नाहीत. यामुळे त्यांचा दावा निकालात काढण्यात आला होता. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले होते.”

“असं असताना 3 वर्षे या निर्णयाला सॉल्ट डिपार्टमेंटने न्यायालयात आव्हान दिले नाही. पण 3 वर्षांनंतर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर मात्र लगेच सॉल्ट डिपार्टमेंटला आठवण झाली. हा योगायोग नाही. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांमुळेच मोदी सरकारने आडकाठी आणण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध,” असंही सचिन सावंत म्हणाले.

‘मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकारस्थान’, कारशेडच्या वादावरुन नवाब मलिकांचा गंभीर आरोप

दरम्यान, मेट्रोचं काम थांबवण्यासाठीच भाजपकडून कटकारस्थान सुरु असल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सर्व बाबी तपासून राज्य सरकार केंद्राला उत्तर देईल, अशी माहितीही मलिकांनी दिली आहे.

‘केंद्र सरकारने 2002 मध्ये मिठागाच्या अनेक जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्या आहेत. ही खासगी जमीन असल्याचा दावा यापूर्वी भाजपनेच केला होता आणि आता केंद्र सरकार त्यावर आपला दावा सांगत आहे. भाजपला मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा असल्यानंच हे कटकारस्थान सुरु आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. केंद्राचा हा दावा तपासून राज्य सरकार केंद्राला योग्य उत्तर देईल, असंही मलिक यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

11 ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले होते. आरे आंदोलनावेळी पर्यावरणवाद्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर केले होते.

संबंधित बातम्या :

‘मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकारस्थान’, कारशेडच्या वादावरुन नवाब मलिकांचा गंभीर आरोप

हे तर महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र; मेट्रोच्या वादात मुंबईच्या महापौरांची उडी

Metro carshed | 4 हजार कोटींच्या उधळपट्टीचा शौक असेल, तर मंत्र्यांनी स्वत:च्या खिशातले उडवावे, राम कदमांची टीका

संबंधित व्हिडीओ :

Congress Leader Sachin Sawant criticize Maharashtra BJP and Modi Government over Mumbai Metro Work