सत्तास्थापनेसाठी काँग्रेसची ‘हात’चलाखी, शिवसेनेसोबत जाण्यासाठी सोनिया गांधींना साकडं

शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेसचे राज्यातील नेते सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सत्तास्थापनेसाठी काँग्रेसची 'हात'चलाखी, शिवसेनेसोबत जाण्यासाठी सोनिया गांधींना साकडं

मुंबई : एकीकडे भाजप सत्तास्थापनेसाठी पुरेशा संख्याबळाची जुळवाजुळव करत असतानाच काँग्रेसनेही मरगळ झटकली आहे. शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेसचे राज्यातील नेते सकारात्मक (Congress may support Shivsena) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येन केन प्रकारे सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आलेला दिसत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. भाजप-शिवसेनेत सत्तासंघर्ष सुरु असेल, तर पर्याय देण्याबाबत आपण सकारात्मक असल्याची भूमिका महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली आहे.

बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण संध्याकाळी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन काँग्रेस नेत्यांनी याबाबतच चर्चा केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसने आधी आपली भूमिका ठरवावी, असं मत शरद पवार यांनी काँग्रेसच्या प्रस्तावावर व्यक्त केलं होतं. त्यामुळे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

काँग्रेस + राष्ट्रवादी + शिवसेना एकत्र आल्यास…

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास एकत्रित संख्याबळ 167 वर पोहचेल. शिवसेनेने विधानसभेला 56 जागा जिंकल्या होत्या. परंतु सात अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे त्यांचं संख्याबळ 63 वर पोहचलं आहे. राष्ट्रवादीने 54, तर काँग्रेसने 44 जागा जिंकल्या आहेत. महाआघाडीतील घटकपक्षांपैकी बहुजन विकास आघाडीने तीन, समाजवादी पक्षाने दोन आणि स्वाभिमानी पक्षाने एक जागा जिंकली आहे.

शिवसेना – 56 + 7 = 63
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बविआ – 03
सपा – 02
स्वाभिमानी – 01
एकूण – 167

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

भाजपलाही 9 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे  त्यांचं संख्याबळ 105 वरुन 114 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 177 वर जातं. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेस ‘हात’ ठेवला आणि राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

 • भाजप – 105
 • शिवसेना – 56
 • राष्ट्रवादी – 54
 • काँग्रेस – 44
 • बहुजन विकास आघाडी – 03 (महाआघाडी)
 • प्रहार जनशक्ती – 02 (शिवसेनेला पाठिंबा)
 • एमआयएम – 02
 • समाजवादी पक्ष – 02 (महाआघाडी)
 • मनसे – 01
 • माकप – 01
 • जनसुराज्य शक्ती – 01 (भाजपला पाठिंबा)
 • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 (शिवसेनेला पाठिंबा)
 • शेकाप – 01 (भाजपला पाठिंबा)
 • रासप – 01 (भाजपला पाठिंबा)
 • स्वाभिमानी – 01 (महाआघाडी)
 • अपक्ष – 13
 • एकूण – 288

  Congress may support Shivsena

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI