‘उमेदवारीसाठी धन्यवाद सोनियाजी’, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा राज्यसभेसाठी नकार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी राज्यसभेची उमेदवारी नाकारली आहे (Congress leader Rajeev Shukla). त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे.

'उमेदवारीसाठी धन्यवाद सोनियाजी', काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा राज्यसभेसाठी नकार

नवी दिल्ली :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी राज्यसभेची उमेदवारी नाकारली आहे (Congress leader Rajeev Shukla). त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय आपल्याला उमेदवारीबाबत विचारणा केल्याबद्दल राजीव शुक्ला यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत (Congress leader Rajeev Shukla).

“राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून माझा विचार केल्याबद्दल सोनियाजी मी आपला आभारी आहे. मात्र, सध्या मला संघटनात्मक बांधणीकडे लक्ष्य द्यायचं आहे. त्यामुळे माझ्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी”, अशी विनंती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी केली आहे.

राज्यसभेच्या विविध राज्यातील 55 जागा लवकरच खाली होणार आहेत. त्यामुळे या सर्व जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, गुजरातच्या जागेसाठी काँग्रेसकडून राजीव शुक्ला यांना उमेदवारी दिली जाणार होती. मात्र, त्यांनी उमेदवारी नाकारली आहे.

महाराष्ट्रातून काँग्रेसचा उमेदवार निश्चित

काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्रातील जागेवरुन राज्यसभेवर कोण जाणार, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राजीव सातव यांच्या उमेदवारीविषयी काँग्रेसकडून अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.

राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला होता. सातव यांच्या रुपाने संसदेच्या वरच्या सभागृहात काँग्रेसचा आवाज पुन्हा कणखर होताना दिसेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI