Nana Patole | मूठभर लोकच श्रीमंत, मोठा वर्ग गरीबीच्या खाईत का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे गणरायासमोर सवाल

| Updated on: Aug 31, 2022 | 2:35 PM

काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष होता आणि राहणार हे निश्चित. मधल्या काळात डोकी फिरवून काँग्रेस कमजोर करण्याचा प्रयत्न केलाय.

Nana Patole | मूठभर लोकच श्रीमंत, मोठा वर्ग गरीबीच्या खाईत का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे गणरायासमोर सवाल
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः देशातील मूठभर लोकच श्रीमंत होत आहेत तर एक मोठा वर्ग गरीबीच्या खाईत लोटला जातोय. यासाठी जे जबाबदार आहेत. देशातील महागाई, बेरोजगारीसाठी जबाबदार असणाऱ्यांना गणराय चांगली बुद्धी देवो, हीच आजच्या दिवशी प्रार्थना आहे, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलंय. देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा प्रवाह नेण्याची काँग्रेसची (Congress) योजना होती. मात्र मागील सात आठ वर्षात ती खंडित झाली, त्यामुळेच हे हाल झाले आहेत. यासाठी जबाबदार कोण आहे, त्याचं नाव मी आज घेणार नाही, कारण आजच्या दिवशी राजकारण (Politics) नको, अशी माझी भूमिका असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं. नाना पटोले यांच्या घरी आज गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष होता आणि तो राहणार असल्याचं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.

गरीब-श्रीमंतीवर काय म्हणाले पटोले?

देशातील गरीब-श्रीमंतीतील दरीवर बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘ जगात श्रीमंत भारतातला एक माणूस होतोय. गरीब-श्रीमंतातली दरी कुणामुळे होतेय, हे सर्वांना माहिती आहे. आज गणेशोत्सवामुळे मी बोलत नाही. उगाच त्याला राजकीय वळण मिळेल. पण मला जे बोलायचं ते लोकांना समजलं. शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात संविधानात आणायची संकल्पना आपण मांडली होती. तो प्रवाह थांबलाय. मूठभर लोकच आज श्रीमंत व्हायला निघालीत. देशातले मोठ्या प्रमाणावर लोक गरीब व्हायला निघालेत. सध्याची कृत्रिम महागाई ज्यांनी वाढवली आहे, त्यांना गणराय सद्बुद्धी देवो, एवढीच मी आजच्या दिवशी प्रार्थना करतो.

गुवाहटीतला तमाशा सर्वांनाच माहितीय…

महाराष्ट्रातील सत्ताकारणावर टीका करताना नाना पटोले म्हणाले, गोवाहटीत काय तमाशा झालाय हे सर्वांनाच माहिती आहे. हे नेते सध्या सत्ता एंजॉय करतायत. पण नेमकं प्रदुषण कुणी केलं हेही अनेकांना ठाऊक आहे..

‘डोकी फिरवून कमजोर करण्याचा प्रयत्न’

काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष होता आणि राहणार हे निश्चित. मधल्या काळात डोकी फिरवून काँग्रेस कमजोर करण्याचा प्रयत्न केलाय. पण आगामी निवडणुकात आमचा पक्षच मोठा हे सिद्ध होईल. आगामी स्थानिक निवडणूका स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन लढू. केंद्र सरकारने तरुण, शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्याय . राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत द्यायला पैसा नाही, आणि वेगवेगळ्या कामात खर्च केलाय. या सरकारने मराठा तरुणांसाठी नोकरी बाबात जे धोरण स्वीकारलं, त्याला विरोध नाही. पण त्यासाठी वेगळा निधी द्यावा, अशी मागणी नाना पटोलेंनी केली. तर आगामी काळातील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचंही पटोले यांनी सांगितलं.