लोकसभेत बाकं वाजवून सोनियांकडून नितीन गडकरींचं कौतुक

लोकसभेत बाकं वाजवून सोनियांकडून नितीन गडकरींचं कौतुक

नवी दिल्ली: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सध्याची वक्तव्य भाजपला आरसा दाखवणारी आहेत. त्यामुळे विरोधकही नितीन गडकरींचं कौतुक करताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता तर खुद्द सोनिया गांधी यांनीही नितीन गडकरींचं कौतुक केलं. सोनिया गांधींनी लोकसभेत पायाभूत सुविधानिर्मितीतील अद्भुत कामाबद्दल नितीन गडकरींची प्रशंसा केली. सोनियांनी चक्क बाकं वाजवून गडकरींच्या कामाला दाद दिली.

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरींनी भारतमाला परियोजना, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे आणि चारधाम परियोजनांबाबतच्या प्रश्नांना उत्तरं दिली. पूरक प्रश्न विचारणारे भाजप, शिवसेना आणि काँग्रेससह अन्य पक्षांच्या नेत्यांनी यावेळी रस्ते, राजमार्ग आणि हायवे याबाबत झालेल्या कामांसाठी गडकरींचं कौतुक केलं. गडकरी आपल्या उत्तरादरम्यान म्हणाले, “माझी ही विशेषत: आहे आणि त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. प्रत्येक पक्षाचा खासदार म्हणतो की त्यांच्या भागात चांगलं काम झालं आहे”

जल आणि गंगासंवर्धन मंत्रालयाचा भारही गडकरींकडे आहे. गडकरींनी उत्तराखंडमधील चारधामांना जोडणाऱ्या योजनेसंबंधी प्रश्नाला उत्तर दिलं. प्रयागमध्ये पहिल्यांदाज गंगा इतकी निर्मळ आणि वाहती असल्याचं गडकरी म्हणाले. अध्यक्ष महोदया तुम्ही स्वत: एकदा जाऊन गंगा नदीचं काम कसं सुरु आहे, याचा आढावा घ्या, असं आवाहन गडकरींनी केलं. त्यावर लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काम झालं आहे आणि आमचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी आहे, असं म्हणत कौतुक केलं.

गडकरी यांच्या उत्तरानंतर भाजप खासदार गणेश सिंह यांनी लोकसभा अध्यक्षांना एक विनंती केली. गडकरींनी केलेली कामं पाहता, त्यांचं अभिवादन प्रस्ताव पारित व्हावा, असं गणेश सिंह म्हणाले. त्यावर भाजप खासदारांनी टेबल वाजवून गडकरींचं अभिनंदन केलं. त्याचवेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गेंसह अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बाकं वाजवून कौतुक केलं.

Published On - 3:52 pm, Thu, 7 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI