“नरेंद्र मोदी आणि अमित शाह तुम्ही मसनात जा, हिमालयात जाऊन संन्यास घ्या!”, दिपाली सय्यद यांचं टिकास्त्र

| Updated on: May 26, 2022 | 6:30 PM

रूपाली पाटील यांच्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवला आहे. "नरेंद्र मोदी आणि अमित शाह तुम्ही मसनात जा", असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह तुम्ही मसनात जा, हिमालयात जाऊन संन्यास घ्या!, दिपाली सय्यद यांचं टिकास्त्र
Follow us on

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांनी काल पुण्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. “तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा… पण आरक्षण द्या!”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. त्यावरून आता महाविकास आघाडीतील नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. रूपाली पाटील यांच्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवला आहे. “नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) तुम्ही मसनात जा”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.

दिपाली सय्यद यांची पंतप्रधानांवर टीका

दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर परखड शब्दात टीका केली आहे. “नरेंद्र मोदी आणि अमित शाह तुम्ही मसनात जा”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत. शिवाय “वाढती महागाई , दरवाढी आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या”, असंही त्या म्हणाल्या आहेत.

रूपाली पाटील काय म्हणाल्या?

रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर ट्विटच्या माध्यामातून टिकास्त्र सोडलंय. “स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती महाकाली तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्याशिवाय शांत होत नसते. बेताल,सत्तापिपासू चंपा!”, असं म्हणत रूपाली पाटलांनी चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

काल भाजपकडून ओबीसी आरक्षणासंदर्भात पु्ण्यात मोर्चा काढण्यात आला होता. यात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. “तुम्ही राजकारणात कश्यासाठी राहत आहात. घरी जा, स्वयंपाक करा…”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रोटोकॉलही समजावला. ते म्हणाले, “तुम्ही खासदार आहात ना, मुख्यमंत्र्यांची भेट कशी घेतात, हे तुम्हाला माहित नाही? शिष्टमंडळ पाठवायचं असतं एवढंही माहित नाही. आता तुम्ही घरी जाण्याची वेळ आली आहे.” त्यापुढे ते म्हणाले, “आम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा… पण आरक्षण द्या!”