TV9 Special :हा तर पंतप्रधान मोदींच्या महिला धोरणाचाही अपमान ! चंद्रकांत पाटलांसारख्या ‘स्वयंपाक कर’ मानसिकतेचं करायचं काय?

TV9 Special :हा तर पंतप्रधान मोदींच्या महिला धोरणाचाही अपमान ! चंद्रकांत पाटलांसारख्या 'स्वयंपाक कर' मानसिकतेचं करायचं काय?
Image Credit source: tv9 marathi

चंद्रकांत पाटलांची ही प्रतिक्रिया विरोधक राजकारण्यावर नसून ती फक्त एका स्त्रीवर आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष केलेल्या प्रत्येकीला हे झोंबणारं आहे.

मंजिरी धर्माधिकारी

|

May 26, 2022 | 6:24 PM

औरंगाबादः  माणूस अधिकारानं आणि पद-प्रतिष्ठेनं कितीही पुढारला तरी त्याची वाणी किती नम्र, समोरच्या व्यक्तीचा आदर करणारी आहे, यावरून त्याचं व्यक्तिमत्त्व जोखलं जातं. विरोधी विचारसरणी असली तरी समोरील व्यक्तीचा आदर राखत विचारांवर घाव कसे घालायचे, याचं कसब जमलं पाहिजे. त्यातल्या त्यात जनतेचे लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय पक्षाचा नेता असलेल्या व्यक्तीला तर जमलंच पाहिजे. हे भाषण देण्याचं कारण म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतंच सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) उद्देशून केलेलं एक वक्तव्य. ओबीसी आरक्षणावरून आक्रमक झालेल्या भाजपनं काल महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्यासाठी मुंबईत मोठा मोर्चा काढला. यावेळी आघाडी सरकारविरोधात आरोप करताना चंद्रकांत दादाची जीभ घसरली. घसरली म्हणण्याऐवजी जीभेवाटे त्यांची स्त्रीद्वेषी वृत्ती क्षणात प्रकटून गेली. मध्य प्रदेश सरकारनं ओबीसी आरक्षणासाठीचा (OBC Reservation) डेटा केंद्राकडून कसा मिळवला, हे विचारण्यासाठी आम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना विचारलं पण त्यांनी काही सांगितलं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांकडून उमटलेली प्रतिक्रिया ही राजकीय नव्हती तर ती हिणकस अशा पुरुषकेंद्रीत मानसिकतेतून आली होती.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

सुप्रिया सुळेंना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण मिळवण्यासाठी नेमकं काय केलं हे सांगितलं नाही. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘एक खासदार असून तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी कसा संपर्क साधायचा, हे कळत नसेल तर कशासाठी राजकारणात राहता. घरी जा. स्वयंपाक करा. आता घरी जाण्याची वेळ आली आहे तुमची… ‘ दिल्लीत जाऊन शोध घेणार असं म्हटल्यावर मसणात जा… असंही ते म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळेंचं राजकीय ज्ञान काय आहे, त्यांना राजकारणातील पद्धती माहिती आहेत की नाही, हा भाग गौण. पण आपल्या बरोबरीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांवर असल्या टिप्पण्यांनी वार करणारी पुरुषी मनोवृत्ती असंख्य ठिकाणी दिसून येते. एक तर तिला थेट चूलीपाशी जा म्हणायचं किंवा चारित्र्यावर टिप्पणी करायची. बाईनं स्वयंपाक घरातून बाहेर येणं आणि स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात ठराविक उंची गाठण्यापर्यंतचा संघर्ष काय असतो, हे समजून घेण्यासाठी संवेदनशील व्यक्तीच हवी. तुम्ही म्हणाल, सुप्रियांना काय संघर्ष करावा लागला? एक सामान्य बाईप्रमाणे सुप्रियांना संघर्ष करावा लागला नसला कोणत्या ना कोणत्या पातळ्यांवर त्यांना आव्हानांना सामोरं जावंच लागलंय.

सदानंद सुळेंची प्रतिक्रिया काय?

चंद्रकांत पाटील हे स्त्री द्वेषी असून जिथे मिळेल तिथे स्त्रियांचा अपमान करतात. माझी पत्नी गृहिणी आहे, ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केलाय, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळेंनी दिलीय.

राष्ट्रवादी नेत्या वैशाली नागवडेंचा इशारा काय?

स्त्री ही लक्ष्मी आहे. सरस्वती आहे. पण वेळ पडली तर ती दुर्गेचंही रुप घेते. आठ वेळा संसदरत्न मिळवणाऱ्या सुप्रिया सुळेंना स्वयंपाक घरात जा म्हणताय… तुमच्याच एका मतदार संघातील महिलेचा सुरक्षित मतदारसंघ तुम्ही घेतलाय हे लक्षात ठेवा…

रुपाली पाटलांनी थेट मैदानात खेचलं

राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना सवाल केलाय. तुमचं मानसिक स्वास्थ बिघडलं आहे का वयोमानानं असं बोललायत?  महिला ही स्वयंपाकघरात गेली तर अन्नपूर्णा असते आणि मसनात गेली तर महाकाली असते , तुमच्या सारख्या घाणेरड्या लोकांच्या विचाराचं मुंडन महाकाली केल्याशिवाय राहणार नाही, सुप्रिया सुळेंची माफी मागितल्याशिवाय पुण्यात पाय ठेवू देणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केलाय.

यशोमती ठाकुरांनीही सुनावलं

काँग्रेस नेत्या व महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही चंद्रकांत दादांना चांगलंच सुनावलं. तुम्ही पुन्हा एकदा महिलांना स्वयंपाक घरात पाठवण्याच्या बाता करतायत. पण आता वेळी अशी आलीय की वहिनी कान्सला जातील आणि भाऊ-दादांना घरी स्वयंपाक करत बसावं लागेल. काळ बदललाय. महिलांना कमी लेखू नका. महिला तुमचं दुकान कधी उखडून टाकतील समजणारही नाही..

हे सुद्धा वाचा

@पंकजा मुंडे, चित्रा वाघ, स्मृती इराणी बोलणार का?

चंद्रकांत पाटलांची ही प्रतिक्रिया विरोधक राजकारण्यावर नसून ती फक्त एका स्त्रीवर आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष केलेल्या प्रत्येकीला हे झोंबणारं आहे. किंबहुना स्त्री-पुरुष भेदभाव न करता केवळ एक व्यक्ती म्हणून स्वीकारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला (यात पुरुषही येतात) याचा संताप यायला हवा. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, चित्रा वाघ आणि स्मृती इराणींवर अशी टीका कुणी केली असती तर त्यांना हे चाललं असतं? का केवळ विरोधी राजकारण्यावर टीका झालीय म्हणून तुम्ही शांत बसलाय? राजकारणाच्या कक्षा सोडून स्वतःला आधी एक व्यक्ती म्हणून स्वीकारलंत तरच ही टिप्पणी तुम्हाला झोंबेल. पण त्यासाठी विचारांच्या कक्षाही रुंद असायला हव्यात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें