
Devendra Fadnavis And Dhananjay Munde : गेल्या अनेक दशकांपासून बीडमध्ये रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी केली जात होती. आता ही मागणी शेवटी प्रत्यक्षात उतरली आहे. कारण आज (17 सप्टेंबर) बीड ते अहिल्यानगर या मार्गाने जाणारी रेल्वे सुरू करण्यात आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या रेल्वेमार्गाचे काम चालू होते. शेवटी आता या रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आहे. दरम्यान, या रेल्वेच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांचा मित्र म्हणून केलेला उल्लेख सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय. त्यामुळे मुंडेंचा केलेला उल्लेख नेमका कोणासाठी इशारा आहे, अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सध्या सुरू झालेल्या ये रेल्वेमुळे अवघ्या 45 रुपयांत बीडहून अहिल्यानगरचा प्रवास करता येणार आहे. तसेच लोकांची प्रवासादरम्यान होणारी अडचणही त्यामुळे कमी होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात याच रेल्वेबाबत माहिती दिली. अनेक लोकांनी ही रेल्वे सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले. यात राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग होता, या सर्वांचे फडणवीसांनी अभिनंदन केले. तसेच बीड जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकार तत्पर आहे असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले. मात्र फडणवीस यांनी आपले भाषण सुरू होतानाच धनंजय मुंडे यांचा खास उल्लेख केला. त्याच उल्लेखाची सध्या चर्चा होतेय.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातील मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांचेच नाव घेतले. तसेच बीड जिल्ह्यातील काही आमदार आणि खासदारांचेही नाव घ्यायला ते विसरले नाहीत. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचा उल्लेख केला. ज्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा समर्थपणे चालवला अशा पंकजाताई मुंडे, असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले. त्यानंतर त्यांनी रजनी पाटील यांचा उल्लेख केला. तसेच बीड जिल्ह्याचे खासदार बजंरग सोनवणे यांचेही नाव घेतले. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे नाव घेताना फडणवीस यांनी त्यांचा ‘आमचे मित्र’ असा उल्लेख केला. त्यांनी मित्र हा शब्द उच्चारताच खाली बसलेल्या प्रेक्षकांनी जल्लोष केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मुंडे यांच्या जवळची व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या वाल्मिक कराड याचे नाव आल्यानंतर मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपाचे नेते तथा आमदार सुरेश धस यांनी देशमुख खून प्रकरण लावून धरले होते.