सुजय विखेंना धक्का, दिलीप गांधींचे सुपुत्र सुवेंद्र गांधी अपक्ष लढणार

सुजय विखेंना धक्का, दिलीप गांधींचे सुपुत्र सुवेंद्र गांधी अपक्ष लढणार

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असातना, दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. कारण अहमदनगरमधील भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी हे अपक्ष लढणार आहेत. भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामुळे आणि नंतर त्यांना उमेदवारी दिल्याने नाराज होते. अखेर आज त्यांच्या मुलाने म्हणजे सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घोषित केला आहे. त्यामुळे सुजय विखे यांच्यासमोर आणखी एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

सुवेंद्र गांधी नेमकं काय म्हणाले?

अहमदनगरमधून मी निवडणुकीत उभे राहणार आहे. माझ्या मागे कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आहे, अशी घोषणा भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी नगरमध्ये केली. तसेच, “काही जणांची मुलं वडिलांचं ऐकत नाही, तर काही आईचं ऐकत नाही. मात्र मी आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडतो.” असे म्हणत सुवेंद्र गांधी यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

मला माफ करा, मी तुमचा आशीर्वाद घेऊन अर्ज भरणार आहे, असेही सुवेंद्र गांधी यांनी खासदार दिलीप गांधी यांना उद्देशून म्हटलं.

अहमदनगरमध्ये खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत राजकीय भवितव्य ठरवण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर अनेकांनी पक्ष सोडण्याचा आग्रह धरला, तर तुम्ही जी भूमिका घेतात ती जबाबदारी आम्ही पार पाडू अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेली. अखेर सुवेंद्र गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, अपक्ष लढण्याची घोषणा केली.

सुजय विखे यांच्यासमोरील अढचणी वाढल्या!

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी त्यांना नगरमधून लढण्यासाठी उमेदवारीही घोषित झाली. त्यामुळे नगरमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. शिवाय, भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधीही हेही नाराज होते. अखेर आता सुवेंद्र गांधींनी हीच नाराजी अपक्ष लढणार असल्याची घोषणा करुन जाहीरही केली.

दुसरीकडे, राष्ट्रवादीने आमदार संग्राम जगताप यांच्या रुपाने सुजय विखेंना तोडीस तोड उमेदवार दिला आहे. त्यामुळे सुजय विखे यांच्यासमोर आता संग्राम जगताप यांच्यासह सुवेंद्र गांधी यांचंही आव्हान असेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *