एकनाथ खडसे यांच्यासह 72 नेते राष्ट्रवादीत, कोणाकोणाचा पक्षप्रवेश?

| Updated on: Oct 23, 2020 | 4:42 PM

मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपमध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला’ अशी खंत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशानंतर बोलून दाखवली.

एकनाथ खडसे यांच्यासह 72 नेते राष्ट्रवादीत, कोणाकोणाचा पक्षप्रवेश?
Follow us on

मुंबई : गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं. (Eknath Khadse Joins NCP with 72 other leader)

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित नव्हते.

एकनाथ खडसे यांच्यासह कोणाकोणाचा पक्षप्रवेश?

एकनाथ खडसे यांच्यासोबत नंदुरबार तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर, बोदवडचे कृषी उत्पन्न बाजार सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे अशा 72 नेत्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘मी 40 वर्ष राजकारण केलं, पण बाईला समोर करून मी राजकारण केलं नाही. तो माझा स्वभाव नाही. मी काही लेचापेचा नाही.’ अशा शब्दात खडसेंनी भाजवर घणाघात केला आहे. ‘संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की माझा किती छळ झाला, अन्याय झाला. मी विधानसभेतही विचारलं की माझा गुन्हा काय? जर माझा काही गुन्हा असेल तर त्याचे कागदपत्र दाखवा असंही म्हटलं. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपमध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला’ अशी टीका खडसे यांनी केली आहे.

खडसेंच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
– आयुष्याची 40 वर्ष भाजपमध्ये काम केलं
– 40 वर्षे ज्या ठिकाणी राहिलो त्यामुळं एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही
– विधानसभेत माझी किती बदनामी झाली, छळ केला गेला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं
– माझं काय चुकलं? या प्रश्नाचं उत्तर मला या क्षणापर्यंत मिळालं नाही.
– मंत्रिमंडळातही मला संघर्ष करावा लागला, तो माझा स्थायी स्वभाव
– उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या वाट्याला सहा जागा यायच्या, त्यातील पाच जागा कायम निवडून आणल्या
– समोरासमोर लढलो पण एकमेकांबद्दल द्वेष ठेवला नाही… पाठीत खंजीर कधी खुपसला नाही.
– 40 वर्षाच्या राजकारणात महिलेला समोर ठेवून राजकारण कधी केलं नाही (Eknath Khadse Joins NCP with 72 other leader)
– त्यांनी ईडी मागे लावली तर मी सीडी लावेल… खोचक टोला
– भारतीय जनता पक्षानं मला अडगळीत टाकलं, आता संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती. रोहिणीताईंना तिकीट दिलं, ते आम्ही मागितलं नव्हतं.
– नाथाभाऊनं पक्षाला सर्वस्व दिलं… त्यावर तुम्ही मला काय दिलं? खडसेंचा भाजपला सवाल
– उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करुन दाखवेन
– दिल्लीतील वरिष्ठांशीही चर्चा केली, त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला पक्षात संधी नाही. तुम्ही राष्ट्रवादीत जा
– डोक्यावरचं ओझे गेल्यासारखे वाटते, हलकं हलकं वाटतं
– जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो

 

संबंधित बातम्या :

‘काना मागून आला आणि तिखट झाला’; जयंत पाटलांची नाव न घेता फडणवीसांवर टीका

माझ्या मागे ED लावली तर मी CD लावेन : एकनाथ खडसे

40 वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही : एकनाथ खडसे

(Eknath Khadse Joins NCP with 72 other leader)