एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाऊनही का म्हणतायत ‘मी घरी बसून’?

| Updated on: Dec 19, 2020 | 8:25 PM

एकनाथ खडसे यांच्या मी घरी बसून आहे या वाक्यप्रयोगावरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाऊनही का म्हणतायत मी घरी बसून?
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

जळगाव : “राज्यात आता काय चाललं आहे, हे मला माहिती नाही. कारण मी घरी बसलो आहे. परंतु, सुडाच्या राजकारणाचा सर्वात मोठा बळी कोणी असेल, तर तो एकनाथ खडसे आहे. माझ्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करण्यात आले”, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगत खदखद व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे आज (शनिवारी) सायंकाळी जळगावात आले होते. आपल्या मुक्ताई निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली (Eknath Khadse reply allegations of Girish Mahajan).

जळगावातील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत शुक्रवारी (18 डिसेंबर) खुलासा करताना गिरीश महाजन यांनी आपल्यावर सुडाच्या राजकारणातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. यामागे जिल्ह्यातील एक बडा नेता असल्याचाही आरोप महाजन यांनी केला. यावेळी महाजन यांनी एकनाथ खडसे यांचा थेट नामोल्लेख टाळून त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. त्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसेंनी आपल्यावर कशा पद्धतीने अन्याय झाला, हे स्पष्ट केलं.

“काहीही कारण नसताना माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा”

“कोणतंही कारण नसताना माझ्यावर खालच्या दर्जाचे राजकारण करत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा मुक्ताईनगरात घडल्याचे दाखवून शून्य क्रमांकाने तो मुंबईत दाखल करण्यात आला. कुणाच्या तरी दबावाशिवाय हे घडणं शक्य होतं का?” असाही सवाल एकनाथ खडसे यांनी यावेळी उपस्थित केला. गिरीश महाजन यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना खडसेंनी म्हणाले, “मी काही बडा नेता नाही. विधीमंडळाचा सदस्यही नाही. मंत्रिमंडळावर माझा प्रभाव नाही. जिल्ह्यात अनेक बडे नेते आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांनी थेट नाव घ्यायला हवं होतं.”

“राज्यात आता काय चाललं आहे, हे मला माहिती नाही, कारण मी घरी बसलो आहे”

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या मी घरी बसून आहे या वाक्यप्रयोगावरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही एकनाथ खडसे आपण घरी बसलोय असं का म्हणत आहेत? या मागे एकनाथ खडसे यांची नाराजी आहे का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

हेही वाचा :

जळगावातील भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो

फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही, खडसेंचा हल्लाबोल

बीएचआर घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही; खडसेंच्या इशाऱ्यानंतर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

Eknath Khadse reply allegations of Girish Mahajan