जळगावातील भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो

भाजपचे भुसावळचे आमदार आणि एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक संजय सावकारे यांचे पोस्टर लागले आहेत

जळगावातील भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो


जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात आणखी धक्के देण्याचा इशारा खडसेंसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपला दिला आहे. आता भाजपचे भुसावळचे आमदारही खडसेंच्या पावलावर पाऊल टाकण्याची चिन्हं वर्तवली जात आहेत. त्याचं कारण म्हणजे आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांच्या पोस्टरवर झळकलेला खडसेंचा फोटो. (BJP Bhusawal MLA Sanjay Savkare puts Eknath Khadse photo on birthday poster)

संजय सावकारेंचं पोस्टर आणि चर्चा

भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक मानले जातात. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सावकारेही हातात घड्याळ बांधणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच सावकारेंच्या वाढदिवशी झळकलेलं पोस्टर राजकीय वर्तुळात कुजबूज वाढवण्यास कारणीभूत ठरले आहे. सावकारेंच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कुठल्याही नेत्याचा फोटो न लावता फक्त एकनाथ खडसे यांचा फोटो लावला. या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खानदेशातील मोठे नेते म्हणून ओळख असलेल्या एकनाथ खडसे यांनी आपल्या हातावर घड्याळ बांधले. त्यानंतर भविष्यात अनेक उलथापालथी होतील, अशा चर्चा रंगल्या होत्या. अनेक खडसे समर्थकांनी राष्ट्रवादी प्रवेश केला, तर काहींनी पक्षांतराच्या अडचणी येऊ नये म्हणून टर्म झाल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

ना संकटमोचकाचा फोटो, ना भाजपच्या दिग्गजांचा

खडसेंचे खानदेश समर्थक म्हणून ओळख असलेले भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि त्यांच्या समर्थकांनी वाढदिवशीच धक्का दिला. एकनाथ खडसे यांच्यासोबत असल्याचा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी सोशल मीडिया आणि जाहिरातीच्या माध्यमातून दिला आहे. या पोस्टर किंवा वृत्तपत्रातील जाहिरातींमध्ये भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील बडे नेते आणि संकटमोचक अशी ख्याती असलेल्या गिरीश महाजन यांचा फोटो नाही. भाजपच्या कुठल्याही मोठ्या नेत्यांचे छायाचित्र नाही. त्यामुळे संजय सावकारे यांचं पुढचं पाऊल कुठल्या दिशेने पडणार, याची उत्सुकता लागली आहे. (BJP Bhusawal MLA Sanjay Savkare puts Eknath Khadse photo on birthday poster)

खडसे समर्थक पाडवीही राष्ट्रवादीत

नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी खडसेंच्या आधी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता. “खडसेंच्या आदेशानेच मी 9 सप्टेंबरला मुंबईला गेलो. तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने, जयंत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला” असे पाडवींनी सांगितले होते.

संबंधित बातम्या 

पक्ष सोडताना दिल्लीवरुन फोन, पक्ष का सोडता अशी विचारणा : एकनाथ खडसे

शिवसेनेत गेलेल्या माजी आमदाराला भाजपची साद

(BJP Bhusawal MLA Sanjay Savkare puts Eknath Khadse photo on birthday poster)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI