Mumbai Potholes : मुंबई खड्डेमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प; महापालिका आयुक्तांसोबत बैठक, युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याच्या सूचना

| Updated on: Jul 23, 2022 | 8:27 PM

गणपती उत्सवापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसंच खड्ड्यांवर कायमस्वरुपती तोडगा काढण्यासाठीही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

Mumbai Potholes : मुंबई खड्डेमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प; महापालिका आयुक्तांसोबत बैठक, युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याच्या सूचना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील (Mumbai) रस्त्यांची अवस्था दयनीय होते. थोडा पाऊस आला तरी रस्त्यांवर मोठाले खड्डे पडतात. पावसाळा तोंडावर आल्यावर डागडुजी केली जाते. मात्र, पुन्हा जैसे थे स्थिती तयार होत असल्याचं मुंबईकर पाहत आले आहेत. मात्र, आता खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलून दाखवलाय. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यावेळी गणपती उत्सवापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसंच खड्ड्यांवर कायमस्वरुपती तोडगा काढण्यासाठीही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

गणेशभक्तांना खड्ड्यांचा त्रास होणार नाही अशी काळजी आम्ही घेणार आहोत. मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी नवं तंत्रज्ञान जिओ पॉलिमरचा वापर केला जाणार आहे. 2 हजार 200 कोटीची कामं सध्या सुरु आहेत. तसंच 400 नवे रस्ते सुरु करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होईल. पुढच्या मार्चपर्यंत 423 किलोमीटरच्या रस्त्यांची काँक्रिटीकरण केलं जाणार आहे. पुढच्या दोन वर्षात मुंबईतील रस्ते पूर्णपणे काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना दिल्याची माहितीही शिंदे यांनी दिलीय.

‘आप’ची ‘आय लव्ह यू खड्डा’ मोहीम

पावसाळ्यापूर्वी मुंबईतील सर्व खड्डे बुजवल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून करण्यात येतो. मात्र, आम आदमी पार्टीने मुंबईत 13 जुलै रोजी अनोखी “आय लव्ह खड्डा” मोहीम राबवली. या मोहिमेच्या माध्यमातून आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी थेट गुगल मॅपच्या माध्यमातून मुंबईतील खडड्यांचे लोकेशन ट्रेस केले. त्या स्पॉटवर जाऊन तेथील लोकेशन डिटेक्ट करुन लोकशन सह त्या ठिकाणी “आय लव्ह खड्डा” असे पोस्टर हातात पकडून फोटो काढले आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून आम आदमी पार्टीने खड्डे बुजवल्याचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कामाची पोलखोल केली आहे. यानंतर जाहीर पत्रकार परिषद घेत आम आदमी पार्टीने मुंबईतील खड्ड्यांची स्थिती मांडली.

खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेची तयारी

पालिकेच्या रस्त्यांसह इतर प्राधिकरणांच्या अखत्यारितील रस्त्यांवरही खड्डे पडतात. मात्र, कोणत्याही रस्त्यांवर खड्डे पडल्यास पालिकेवर टीका होते. यावरुन दरवर्षी पावसाळा लागला की राजकारणही तापतं. मुंबईत विविध प्राधिकरणांकडून तीनशेहून अधिक कामं सुरु असल्यानं खड्डे वाढतात. मुंबईत 25 किमी लांबीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग, 25 किमी लांबीचा पूर्व द्रुतगती महामार्ग आणि बीकेसीतील रस्ते हे एमएमआरडीएच्या अखत्यारीत येतात. या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पाहिलेकसह संबंधित यंत्रणांकडून व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर करण्यात आलाय आहे. यामुळे आता पालिकेनं चांगलंच मनावर घेतल्याच पाहायला मिळतं.