
एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी या तिघांचा एकाच बॅनरवर फोटो, हे कसं शक्य आहे. पण घडलय. उमरगा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात. शिवसेना-काँग्रेस-लहुजी शक्ती सेना-रयत क्रांती व मित्र शहर विकास पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे व प्रभाग क्रं. २ चे अधिकृत उमेदवार,असं या बॅनरवर नमूद करण्यात आलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तिन्ही नेत्यांचा हा एकत्रित फोटो एक्सवर पोस्ट करुन टीका केली. त्यावर शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “दानवे यांनी काय ट्विट केलं, काय फोटो टाकले मी बघितले नाही आणि हे एकनाथ शिंदे साहेबाला सुद्धा माहित नाही. कोण कुठले बॅनर लावतात” असं संदीपान भुमरे म्हणाले.
“पुढाऱ्याला किंवा नेत्याला माहीत नसते. हा जो बॅनरचा विषय आहे, हा स्थानिक पातळीवर झाला असेल याची कल्पना एकनाथ शिंदे,सोनिया गांधी,राहुल गांधींना सुद्धा नसेल. अंबादास दानवे यांनी ट्विट करण्यापेक्षा महाराष्ट्रात किती जागा येतील, आता हे तपासावे आणि त्या वेळेला तुमची तुम्हाला लायकी कळेल” अशा शब्दात संदीपान भुमरे यांनी हल्लाबोल केला. “तुम्ही शिंदे साहेबावर बोलत असाल तर तुमची काय परिस्थिती आहे, ही लायकी तुम्हाला कळेल. मला तरी वाटते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदें विषयी बोलू नये, कारण जे काही आज अंबादास दानवे आहेत ते एकनाथ शिंदेंमुळे आहेत” असं संदीपान भुमरे म्हणाले.
उबाठाचा सर्व फुफाटा होणार आहे
“महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांच्या विश्वासावर नगरपरिषद, नगरपालिका सर्व शिवसेनेच्या ताब्यात येतील आणि यात शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही. उबाठाला निवडणुकीसाठी उमेदवार भेटले नाही. त्यामुळे उबाठाचा सर्व फुफाटा होणार आहे” असा संदीपान भुमरे यांनी दावा केला.
विचारांमध्ये थोडेफार इकडे तिकडे झालं असेल
“जंजाळ आणि शिरसाट यांच्यामध्ये मतभेद नाहीत. विचारांमध्ये थोडेफार इकडे तिकडे झालं असेल, पण मतभेद नाहीत. जंजाळ हे पालकमंत्र्यांच्या विषयी बोलले आहेत, पक्षाविषयी बोलले नाहीत, जंजाळ पक्षावर नाराज नाहीत” असं संदीपान भुमरे यांनी सांगितलं.