एकनाथ शिंदे आणि राहुल गांधींचा एकत्रित फोटो, राज्याच्या राजकारणात काय घडतंय? त्या फोटोची महाराष्ट्रभर चर्चा
अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर तीव्र टीका केली आहे. एका निवडणुकीच्या बॅनरवर शिंदे, सोनिया आणि राहुल गांधी एकत्र दिसल्याने राजकीय वाद निर्माण झाला. काँग्रेस नको म्हणून बंडखोरी करणाऱ्या शिंदेंवर दानवेंनी 'बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगले' अशी टीका केली. यामुळे स्थानिक राजकारण आणि शिंदे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. सध्या सोशल मीडियावर निवडणुकीच्या प्रचाराचे एक बॅनर व्हायरल होत आहे. या बॅनरवर एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी या तिघांचा एकत्र फोटो पाहायला मिळत आहे. हे बॅनर पोस्ट करत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु आहे.
बॅनरवर नेमकं काय?
अंबादास दानवे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका बॅनरचा फोटो पोस्ट केला आहे. या बॅनरमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो दिसत आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह देखील स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
हा बॅनर उमरगा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आहे. शिवसेना-काँग्रेस-लहुजी शक्ती सेना-रयत क्रांती व मित्र शहर विकास पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे व प्रभाग क्रं. २ चे अधिकृत उमेदवार, असे या बॅनरवर नमूद करण्यात आले आहे. यावरुन अंबादास दानवेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
अंबादास दानवेंचे ट्वीट
काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सुरत-गुवाहाटी-गोवा असा पळपुटा प्रवास केलात आणि नाकाने वांगे सोलले… आता घ्या! कटप्रमुख एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकाच बॅनरवर.. ते ही धनुष्यबाण चिन्हासह ! थोडक्यात, दिल्लीश्वरांच्या भीतीने ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीला टांगले आहेत.” “याला म्हणतात बुडाखालील अंधार !, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. अंबादास दानवे यांनी ही पोस्ट अमित शाह आणि महाराष्ट्र भाजपलाही टॅग केली आहे.
काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सुरत-गुवाहाटी-गोवा असा पळपुटा प्रवास केलात आणि नाकाने वांगे सोलले..
आता घ्या! कटप्रमुख एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकाच बॅनरवर.. ते ही धनुष्यबाण चिन्हासह!
थोडक्यात, दिल्लीश्वरांच्या भीतीने ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीला टांगले आहेत.… pic.twitter.com/rwrhQdgVsi
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 27, 2025
अंबादास दानवे यांनी या राजकीय विरोधाभासावर बोट ठेवत शिंदे गटाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. बंडखोरी करताना बाळासाहेबांचे विचार वाचवण्याचे कारण देणाऱ्या शिंदे गटावर त्यांनी गंभीर आरोप केला. यामुळे भाजप आणि शिंदे गट यांच्या महायुतीतील स्थानिक राजकीय गणितांवर प्रश्न निर्माण झाले आहेत. महायुतीमध्ये असताना स्थानिक निवडणुकीत काही ठिकाणी भाजप-शिंदे गटाला काँग्रेसशी जुळवून घ्यावं लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच काँग्रेससोबत असल्यामुळे बाळासाहेबांचे विचार सोडल्याचा आरोप करत शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केली होती. मात्र, आता त्याच काँग्रेस नेत्यांचे फोटो बॅनरवर दिसल्याने शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे.
