राज्यात अनेक ठिकाणी EVM बिघाड, कुठे कुठे EVM बंद?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. मात्र, मतदानाच्या सुरुवातीपासूनच काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांचाही हिरमोड होताना दिसला. EVM बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांकडून दुरुस्ती करण्यात आली किंवा पर्यायी मशीन उपलब्ध करुन दिले गेले. राज्यभरात कुठे कुठे EVM बंद? सांगली : सकाळी मतदानाच्या सुरुवातीलाच तासगाव […]

राज्यात अनेक ठिकाणी EVM बिघाड, कुठे कुठे EVM बंद?
Follow us on

मुंबई : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. मात्र, मतदानाच्या सुरुवातीपासूनच काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांचाही हिरमोड होताना दिसला. EVM बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांकडून दुरुस्ती करण्यात आली किंवा पर्यायी मशीन उपलब्ध करुन दिले गेले.

राज्यभरात कुठे कुठे EVM बंद?

सांगली :

सकाळी मतदानाच्या सुरुवातीलाच तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील मतदान केंद्रावर एका EVM मध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. त्यामुळे जवळपास 1 तास मतदान थांबले. मशीन बदलल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे EVM बिघाडीचा हा प्रकार खासदार संजय पाटील यांचे मतदान ज्या केंद्रावर होते तेथेच झाला. मात्र, दुरुस्तीनंतर खासदार पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.

सांगली शहरातील मतदान केंद्र 207 वरील EVM मध्ये सकाळी बिघाड झाला. त्यामुळे 2 तास मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. दुसरीकडे त्रिकोणी बागेजवळील बाल मंदिर मॉन्टेसरी मतदान केंद्रावर बटन न दाबता भाजपच्या उमेदवाराला मतदान होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सुर्यवंशी यांनी केला. तसेच EVM वर एकूण 38 मतदान झाल्याचे दाखवत असताना VVPAT वर 40 मतदान झाल्याचे दिसत होते, असाही आरोप झाला. त्यामुळे संबंधित मशी सील करण्यात आले.

सोलापूर : 

माझा मतदारसंघातील निमगाव येथील EVM बंद पडले. त्यामुळे मतदारांना प्रतिक्षा करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्याच गावातील हा प्रकार आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापूर वार्ड क्रमांक 395 वरील EVM देखील मतदानादरम्यान बंद पडले. त्यामुळे मतदारांना ताटकाळात रांगेतच उभे राहावे लागले.

औरंगाबाद :

जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील गारजा येथे सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान यंत्र (EVM) बंद पडले. मशीनच्या केबलमध्ये बिघाड असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे येथे तब्बल 1 तास एकही मतदान झाले नाही. त्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. दुसरीकडे कापूस वडगाव येथेही मतदान यंत्र बंद पडले. त्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे मतदारांना ताटकाळत उभे राहावे लागत आहे. चंद्रकांत खैरे मतदान करायला आले असता त्यांचे मतदान असलेल्या ठिकाणीही EVM बंद पडले. त्यामुळे खैरेंनाही काही काळ मतदानासाठी थांबावे लागले. मात्र, काही वेळेतच मशीन दुरुस्त करण्यात आल्यानंतर मतदान सुरु झाले आणि खैरेंनीही मतदान केले.

कोल्हापूर :

कोल्हापूरमधील महाराणा प्रताप हायस्कुल येथील मतदान केंद्रावरही EVM बंद पडले होते.

अहमदनगर :

जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राशीन मतदान केंद्रावर EVM बंद पडले. सुरुवातील 8 मते पडल्यानंतर 9 वे मतदान सुरु असतानाच मशीन बंद झाले. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर लोकांच्या रांगा लागल्या.

रायगड : 

जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातही मतदान यंत्र बंद झाल्याची घटना घडली. अलिबागमधील थळा चाळमळा येथील 102 क्रमांक मतदान केंद्रावर हा बिघाड झाला. त्यानंतर काही काळ काळजीचे वातावरण होते. मात्र, काही वेळेतच मशीन दुरुस्त करुन मतदान पुन्हा सुरु झाले.

रत्नागिरी : 

चिपळूण तालुक्यातील कळम्बस्ते येथे मतदान केंद्रात बिघाड झाला. त्यामुळे 30 मिनिटे मतदान प्रक्रिया थांबली. त्यानंतर नवे EVM उपलब्ध करुन दिल्यानंतर मतदान पुन्हा सुरु झाले. मिरजोळे येथीलही हनुमान नगर आणि लक्ष्मीकांत वाडी या 2 मतदान केंद्रावर EVM बंद पडल्याने 20 मिनिटे मतदान प्रक्रिया ठप्प झाली. मशीन बदलवण्यात आल्यानंतर मतदान पुन्हा सुरु झाले. जिल्ह्यातील मडंणगड तालुक्यातील आंबिवली आणि पाले मतदान केंद्रात 2 तासांपासून EVM बंद झाले आहे. त्यामुळे बराच काळ मतदान प्रक्रिया थांबली होती.