‘शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा’, पडळकरांचं राऊतांना पत्र

| Updated on: Dec 18, 2020 | 10:05 AM

'सामना'च्या अग्रलेखात संजय राऊत यांनी गोपीचंद पडळकरांचा फेकूचंद असा उल्लेख केला होता. त्याला पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा, पडळकरांचं राऊतांना पत्र
Follow us on

मुंबई: सामनाच्या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख केला. त्यानंतर आता पडळकरांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पडळकर यांनी राऊतांना थेट पत्रच लिहिलं आहे. त्यात तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? असा प्रश्न विचारत अनेक मुद्द्यांवर राऊतांची कोंडी करण्याचा प्रयत्न पडळकरांनी केलाय.(Gopichand Padalkar criticize Sanjay Raut)

“खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीनं आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे. प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे”, अशा शब्दात पडळकर यांनी राऊतांना खडे बोल सुनावले.

2 दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोपीचंद पडळकर यांनी धनगरी पेहरावात ढोल वाजवून सरकारचं लक्ष धनगर समाजाच्या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुन संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात गोपीचंद यांचा उल्लेख फेकूचंद असा केला होता. त्यावर बोलताना, “मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी, समाजाच्या सुखदु:खांशी मी नाळ तोडलेली नाही. माझ्या दु:खी धनगर समाजाचे दु:ख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही हजारवेळा येईन. ते स्वातंत्र्य आपण वा आपल्या सरकारने मला दिलेले नाही. ते स्वातंत्र्य मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिले आहे. पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते. मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार. राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे. सगळं लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमध्ये असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा अंदाज तरी कसा येणार”, असा घणाघात पडळकरांनी केलाय.

कंगना प्रकरणावरुनही समाचार

“राज्याच्या प्रतिष्ठेवर दारुची गुळणी करणाऱ्याला जाब विचारताना संजय राऊतांनी दारुची दुकानं उघडून मंदिर बंद ठेवण्याने राज्याची कोणती प्रतिष्ठा वाढली गेली हे ही सांगावे. फक्त टीका केली म्हणून एखाद्या नटीला जेरीस आणायचं अन् उखाड दिया म्हणत अशा भुरट्या मर्दानगीचं प्रदर्शन मांडायचं हे कसलं स्त्रीदाक्षिण्य? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही दाखले देत आपलं राजकारण करता त्यांचा आदर्श विसरलात का? शत्रुगटातील स्त्री असली तरी तिची खणा-नारळाने ओटी भरुन यथोचित सन्मान करण्याची आपली परंपरा आहे. का ते ही महाविकास आघाडीत जाऊन विसरले?” असे अनेक सवाल पडळकरांनी राऊतांना विचारले आहेत.

‘मोदींवर बोलण्याची लायकी आहे का?’

“संजय राऊतजी आपला पगार किती आणि आपण बोलता किती? आपल्या पक्षाचे जेवढेही खासदार निवडून आले ते भाजपच्या आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडून आलेले आहेत, याचा इतका लवकर विसर पडला आपल्याला? पंतप्रधान मोदींवर वाट्टेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? उठसुठ कोणत्याही विषयावर आणि व्यक्तीवर काहीही बोलण्याचे लायसन्स आपल्याला मातोश्रीवरुन मिळाले की बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले हे महाराष्ट्राला कळू द्या.”

‘आपली निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी’

“शरद पवार यांच्या विषयी मी मध्यंतरी काही विधानं केली. तेव्हा आपला चांगलाच जळफळाट झाला होता. ते साहजिकच आहे, कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत, असे शिवसेनेतील आमचे मित्र सांगतात. माझ्यात सभ्यता आहे आणि अजूनतरी ती मी आपल्याबाबतीत सोडलेली नाही. पण आपली एकूणच पवारांबाबतची हुजरेगिरी पाहता आपल्याला तीच उपाधी मी देखील द्यावी, असं राहून राहून वाटतं”, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांवर आसूड ओढलाय.

‘सामना’तून पडळकरांवर जोरदार निशाणा

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवत होत्या. हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकलं असतं, पण फेकूचंदना लोकशाही मार्गानं ढओल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाही भूमिका आहेच.

संबंधित बातम्या:

‘…तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते’ शिवसेनेचा घणाघात

महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तिरस्कार करतंय, पडळकरांचा गंभीर आरोप

Gopichand Padalkar criticize Sanjay Raut