महिला प्रवर्गात तृतीयपंथीचा अर्ज, निवडणूक अधिकाऱ्यासमोर प्रश्न, छाननीत अर्जावर मोठा निर्णय

जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Jalgaon Gram Panchayat Election) काल छाननी प्रक्रिया पार पडली.

महिला प्रवर्गात तृतीयपंथीचा अर्ज, निवडणूक अधिकाऱ्यासमोर प्रश्न, छाननीत अर्जावर मोठा निर्णय
जळगावात तृतीयपंथीच्या उमेदवारी अर्जावर हरकत
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 8:03 PM

जळगाव : जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Jalgaon Gram Panchayat Election) काल छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत जळगाव तहसील कार्यालयात एका तृतीयपंथीच्या उमेदवारी अर्जावरुन चांगलेच ‘महाभारत’ घडले. तृतीयपंथीच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज बाद केला. यामुळे संतप्त झालेल्या तृतीयपंथींनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला.(Jalgaon Gram Panchayat Election)

जळगाव तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील नामक तृतीयपंथीने सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा असलेल्या एका वॉर्डातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जासोबत त्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडली होती. आज उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जावर हरकत घेत अर्ज बाद केला. तृतीयपंथी असल्याने त्यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही, असा खुलासा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला.

या कारणावरुन अंजली पाटील यांनी संताप व्यक्त केला. आपला अर्ज चुकीची हरकत घेऊन बाद केला आहे. हा आपल्यावर अन्याय असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी पत्रकारांकडे आपली बाजू मांडताना तृतीयपंथी अंजली पाटील यांनी सांगितले की, “मी एक तृतीयपंथी आहे. सर्टिफाईड ट्रान्सजेंडर असल्याबाबत माझ्याकडे प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. एवढेच नव्हे तर भारत सरकारने दिलेले आधार कार्ड, मतदान कार्डही आहे. त्यावर देखील माझा तृतीयपंथी म्हणून उल्लेख आहे. असे असताना मला निवडणूक लढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने माझा उमेदवारी अर्ज बाद केला आहे”.

माझा अर्ज जर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून दाखल करता येत नव्हता, तर मला अर्ज दाखल करतेवेळी किंवा अर्ज बाद करण्यापूर्वी विहित वेळेत कळवायला हवे होते. आता मला न्याय हवा आहे, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ऐकावं ते नवलंच! नाशकातल्या एका गावात चक्क कोट्यवधी रुपयांत सरपंचपदाचा लिलाव    

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत निवडणूक; ग्रामस्थांचा निर्णय काय?