Rajyasabha Election Live | राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर, मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे विजयी

आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये राज्यसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे

Rajyasabha Election Live |  राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर, मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे विजयी

मुंबई : राज्यसभेच्या 24 जागांसाठी आज दहा राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. यापैकी पाच जागा बिनविरोध तर 19 जागांसाठी मतदान झालं. त्याचे निकाल हाती आले आहेत. राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, आंध्रप्रदेशात चारही जागा वायएसआर काँग्रेसला, राजस्थानात दोन काँग्रेस, एक भाजप आणि मध्य प्रदेशात दोन भाजप तर एक जागा काँग्रेसला मिळाली.

मध्य प्रदेशात भाजपकडून रिंगणात असलेले ज्योतिरादित्य शिंदे विजयी झाले आहेत. याशिवाय काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांनीही बाजी मारली.

आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर या राज्यांमध्ये चुरस पाहायला मिळली. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली. त्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास निकाल हाती आले.  (Gujarat Rajasthan Madhya Pradesh Rajyasabha Election Live Update)

आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये राज्यसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कर्नाटकात चारही जागांवर, तर अरुणाचल प्रदेशमध्ये एका जागेवर बिनविरोध निवडणूक झाली आहे.

कोणत्या राज्यात किती जागा?

आंध्र प्रदेश- 4
गुजरात- 4
कर्नाटक- 4 (बिनविरोध)
राजस्थान- 3
मध्य प्रदेश- 3
झारखंड- 2
मणिपूर- 1
मिझोराम- 1
मेघालय- 1
अरुणाचल प्रदेश- 1 (बिनविरोध)

गुजरातमध्ये चुरस

गुजरातमध्ये काँग्रेसने शक्तीसिंह गोहिल आणि भारतसिंह सोलंकी यांना उमेदवारी दिली आहे, तर सत्ताधारी भाजपने अभय भारद्वाज, रमिलाबेन बारा आणि नरहरी अमीन यांना रिंगणात उतरवले आहे. चार जागांसाठी 5 उमेदवार नशीब आजमावत असल्याने गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे.

गुजरातमध्ये 182 पैकी 172 आमदार मतदान करु शकणार आहेत. विजयासाठी 35 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजपकडे 103 तर काँग्रेसकडे 66 आमदार आहेत. तिसरी जागा जिंकण्यासाठी भाजपला केवळ 2 आमदारांची गरज आहे, तर काँग्रेसला दुसरी जागा जिंकण्यासाठी आणखी 4 आमदार हवे आहेत. न्यायालयीन खटल्यांमुळे विधानसभेच्या दोन जागा रिक्त आहेत.

मटार विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार केसरसिंह जेसांगभाई सोलंकी मतदानासाठी थेट इस्पितळातून रुग्णवाहिकेने विधानसभेत दाखल झाले. तब्येत बिघडल्यामुळे ते रुग्णालयात दाखल होते.

राजस्थानमध्ये कांटे की टक्कर

राजस्थानमध्ये काँग्रेसकडे 107 आमदार असून त्यांना 12 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपकडे 72 आमदार असून त्यांना राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या तीन आमदारांचे पाठबळ आहे. केसी वेणुगोपाल आणि प्रदेश सरचिटणीस नीरज डांगी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर भाजपचे राजेंद्र गेहलोत आणि ओंकारसिंग लखावत निवडणूक रिंगणात आहेत. तीन जागांसाठी चौघे मैदानात असल्याने चुरस वाढली आहे

जयपूरमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी भाजप आमदार तीन बसेसने विधानसभेत पोहोचले.

आंध्र प्रदेशात ‘क्लीन स्वीप’ विजय

175 सदस्यांच्या आंध्र प्रदेश विधानसभेत 151 आमदारांसह जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील वायएसआर कॉंग्रेस चारही जागा आरामात जिंकू शकेल. एन चंद्रबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखालील तेलगू देशम पक्षाला राज्यसभा निवडणुकीत संधी दिसत नाही.

कर्नाटकात माजी पंतप्रधान बिनविरोध

कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार होती, मात्र माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे (सेक्युलर) प्रमुख एचडी देवगौडा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, भाजपचे उमेदवार इरान्ना कडाडी आणि अशोक गस्ती बिनविरोध निवडले गेले.

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य-दिग्विजय यांचा विजय सोपा

मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसने तीन जागांसाठी प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह राज्यसभा निवडणूक सहज जिंकण्याची अपेक्षा आहे. तिसर्‍या जागेसाठी भाजप नेते सुमेरसिंग सोलंकी आणि काँग्रेस नेते फूलसिंह बरैया यांच्यात रस्सीखेच होणार आहे.

भोपाळमध्ये विधानसभेसाठी काँग्रेस आमदार असलेल्या बसेस पक्षाचे नेते कमलनाथ यांच्या निवासस्थानावरुन रवाना झाल्या.

(Gujarat Rajasthan Madhya Pradesh Rajyasabha Election Live Update)

झारखंडमध्ये टक्कर 

झारखंडमध्ये झामुमो-कॉंग्रेस-राजद आघाडीने झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन आणि कॉंग्रेसच्या शहजादा अन्वर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आपले प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांना उमेदवारी दिली आहे

अपक्ष आमदार सरयू राय आणि अमित यादव यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. “आम्हाला अन्य 2 आमदारांचा पाठिंबा मिळेल आणि दीपक प्रकाश यांना राज्यसभेवर पाठवू शकू, अशी आशा भाजप आमदार बिरांची नारायण यांनी व्यक्त केली. झारखंडमध्ये दोन जागांसाठी मतदान होत आहे.

मेघालयात सत्ताधारी पक्षाचा विजय निश्चित 

मेघालयात सत्तारुढ नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार वानवे रॉय खारलुखी आणि काँग्रेसचे ‘केनेडी कॉर्नेलियस ख्याइम’ हे एकमेव जागेसाठी समोरासमोर उभे ठाकले आहेत. मेघालय लोकशाही आघाडीकडे 60 सदस्यीय मेघालय विधानसभेत 41 जागा आहेत, तर काँग्रेसकडे 19 आमदार आहेत.

मणिपूरमध्ये भाजपची वाट बिकट

मणिपूरमध्ये भाजपाने लेसेम्बा सनाजोबा यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसने टी मांगी बाबू यांना तिकीट दिले आहे. नऊ आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यसभेची एकमेव जागा जिंकणे सत्ताधारी भाजप आघाडीला कठीण जाईल.

अरुणाचलमध्ये भाजप बिनविरोध

अरुणाचल प्रदेशमधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी भाजप नेते नबम रेबिया यांची बिनविरोध निवड झाली.

(Gujarat Rajasthan Madhya Pradesh Rajyasabha Election Live Update)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *