मेगाभरतीचं दुसरं पर्व लवकरच, विरोधी पक्षातील निम्मे आमदार भाजपच्या संपर्कात, प्रसाद लाड यांचा दावा

विरोधीपक्षाचे 82 आमदार धरले, तर 40 आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मेगाभरतीचं दुसरं पर्व लवकरच, विरोधी पक्षातील निम्मे आमदार भाजपच्या संपर्कात, प्रसाद लाड यांचा दावा

मुंबई : भाजप ‘हाऊसफुल्ल’ झाला असून पक्षप्रवेश थांबवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काहीच दिवसांपूर्वी केला होता. मात्र त्यानंतर ‘राजकीय मेगाभरती’चं दुसरं पर्व सुरु होण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण विरोधी पक्षातील निम्मे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला आहे.

संपर्कात तर संपूर्ण महाराष्ट्र आहे, मात्र पक्षात कोणाला घ्यायचं, आणि कोणाला नाही, याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री घेणार आहेत. पक्षात काहीच राहिलं नसेल तर प्रत्येक जण वाट शोधतो, अशीच काहीशी परिस्थिती राष्ट्रवादीची झालेली आहे. त्यामुळे पक्षातील अनेक जण शिवसेना-भाजपच्या संपर्कात आहेत, असं प्रसाद लाड म्हणाले.

विरोधीपक्षाचे 82 आमदार धरले, तर 40 आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट लाड यांनी केला. आतापर्यंत सात ते आठ आमदारांचा प्रवेश झाला असून आणखी आठ-दहा आमदार पक्षात येतील, अशी खात्री प्रसाद लाड यांना वाटते.

ठाणे ते सिंधुदुर्ग पट्ट्यातील दोन-तीन आमदार भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, असंही लाड यांनी म्हटलं आहे. ज्यांची प्रतिमा चांगली आहे, ज्यांना जनसमुदायात मान्यता आहे, अशा लोकप्रतिनिधींनाच पक्षात प्रवेश दिला जाईल, असं प्रसाद लाड म्हणतात. लवकरच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होईल, असे संकेत प्रसाद लाड यांनी दिले आहेत.

येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमधील युती कायम राहील, असा विश्वासही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात शिवसेना हा छोटा भाऊ असल्याचं संबोधलं होतं. त्यामुळे सेनेचा आमदार फोडण्याचा प्रश्नच येत नाही, असंही लाड यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न भाजप करेल, त्याचप्रमाणे शिवसेनेकडूनही प्रामाणिक कामाची अपेक्षा असल्याचं प्रसाद लाड म्हणाले.

पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भाष्य न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे मेगाभरतीविषयी अधिक बोलण्यास लाड यांनी नकार दिला.

भाजपमध्ये मेगाभरती

शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *