Shivsena | आमदार-खासदार पळाले, हिंगोलीत ‘ढाण्या वाघ’ उठला, सुभाष वानखेडे शिवसेनेत, उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन!

हेमंत पाटील आणि संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे हा ढाण्या वाघ पुन्हा शिवसेनेत दाखल झालाय. येत्या काळात आणखी मोठे नेते शिवसेनेत येणार असल्याचे बोलले जात आहे.

Shivsena | आमदार-खासदार पळाले, हिंगोलीत 'ढाण्या वाघ' उठला, सुभाष वानखेडे शिवसेनेत, उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन!
उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधताना सुभाष वानखेडे आणि दुसऱ्या छायाचित्रात त्यांच्यासोबत विनायक भिसे
Image Credit source: tv9 marathi
रमेश चेंडके

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jul 20, 2022 | 6:49 PM

हिंगोलीः खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) आणि आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेला धक्का बसलाय. शिवसेनेला हिंगोली जिल्ह्यात आक्रमक चेहरा उरला नाही, असं म्हटलं जातंय. पण एकेकाळी शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले माजी खासदार सुभाष वानखेडे (Subhash Wankhede) यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. यामुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. सुभाष वानखेडेंनी पुन्हा खांद्यावर भगवा घेतलाय. हेमंत पाटलांची जागा वानखेडे यांनी भरून काढलीय, असे म्हटले जात आहे. संतोष बांगरला टक्कर देणारा मराठा चेहरा छावा दलाचे नेते विनायक भिसे यांचाही वानखेडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून घेतलाय. यामुळे शिवसेनेत पडलेली फूट भरुन निघणार आहे. विनायक भिसे हा मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत आहे, मराठा आरक्षणासाठी विनायक भिसे यांनी फार मोठी आंदोलन उभारली होती. विनायक भिसे यांना संतोष बांगर प्रमाणेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असून दोघे ही एकमेकांचे जुने राजकीय शत्रू आहेत.

कोण आहेत सुभाष वानखेडे?

सुभाष वानखेडे हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव मतदार संघातील एकनिष्ठ शिवसैनिक होते. त्यांचा आक्रमकपणा बघून बाळासाहेबांनी त्यांना हदगाव मतदार संघातून उमेदवारी दिली होती. हदगाव मतदार संघातून सुभाष वानखेडे निवडून आले होते. सुभाष वानखेडे सलग तीनदा आमदार तर एकवेळ खासदार होते. हिंगोली जिल्ह्यात खासदार पाटील आणि आमदार बांगर यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेने नव्याने बांधणी सुरू केली आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांत पाटिलांचा पराभव करून वानखेडे हिंगोलीतून खासदार झाले होते. 2014 लोकसभा निवडणुकीत अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या राजीव सातव यांचा तिथे विजय झाला. हा माझा पराभव शिवसेनेतील दोन आमदारांमुळे झाला, असा आरोप करून सुभाष वानखेडे शिवसेनेला जयमहाराष्ट्र केला होता. त्यानंतर ते भाजपात गेले. 2019 ला आयत्यावेळी भाजपला सोडचिठ्ठी देत वानखेडे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर हिंगोली लोकसभेतून निवडणूक लढविली होती. पण शिवसेनेचा गद्दार म्हणून शिवसैनिकांनी 20 दिवसांपूर्वी आलेल्या नांदेड येथील हेमंत पाटलांना मोठ्या फरकाने निवडून दिले .

ठाकरे गटाची खिंड लढवणार

आता हेमंत पाटील आणि संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे हा ढाण्या वाघ पुन्हा शिवसेनेत दाखल झालाय. येत्या काळात आणखी मोठे नेते शिवसेनेत येणार असल्याचे बोलले जात आहे. यात संतोष बांगर यांच्याकडून विधानसभेला पराभूत झालेले अजित मगरही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पण आयत्या वेळी उद्धव ठाकरे साहेबांना बळ देण्यासाठी आलेले हे रोखठोक आणि आक्रमक नेते मूळ शिवसैनिकांना किती रुचतात ? वानखेडे जुन्या निष्ठावान शिवसैनिकांचे मन वळवून घेण्यात किती यशस्वी होतात? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें