हॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला

शिवसेना नेते आणि गृह राज्यमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडलं.

हॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला

सिंधुदुर्ग : शिवसेना नेते आणि गृह राज्यमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडलं. राणेंनी हॅटट्रिक चुकवायची असेल, तर पुन्हा निवडणूक लढवू नये, असं केसरकर म्हणाले. नारायण राणे हे विधानसभेची (Maharashtra Assembly Election) निवडणूक कुडाळ-मालवण या मतदारसंघातून लढवणार असल्याची घोषणा त्यांचे सुपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राणेंवर निशाणा साधला.

केसरकर म्हणाले, “नारायण राणे हे दोनवेळा हरले आहेत. गेल्या विधानसभेला कुडाळमधून हरले, तर पोटनिवडणुकीत वांद्रे मतदारसंघातही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता त्यांना हॅटट्रिक चुकवायची असेल, तर पुन्हा राणेंनी निवडणूक लढवू नये”

सिंधुदुर्गाचा असा इतिहास आहे, एकदा हरला की तो कितीही मोठा नेता असला तरी पुन्हा निवडून येत नाही. त्यामुळे त्यांनी अशी रिस्क घेऊ नये, असा सल्लाही केसरकर यांनी नारायण राणेंना दिला.

नारायण राणे हे मोठे नेते आहेत. त्यांनी सर्वोच्च पदे भूषविली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी काय करावं हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक हे तरूण तडफदार आहेत, त्यांचा चांगला संपर्क आहे. ते निवडून येतील, असं दीपक केसरकर म्हणाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता. तर वर्षभराने वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना शिवसेनेच्या तृप्ती बाळा सावंत यांनी हरवलं होतं.

मुख्यमंत्रीपदाबाबत

सध्या शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन स्पर्धा रंगली आहे. त्याबाबतही केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. “शिवसेना-भाजपची अभेद्य युती आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत कोणीही वक्तव्य करु नये, असं स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. हा प्रश्न वरिष्ठांचा आहे आणि आम्ही तो आमच्या पद्धतीने मिटवू, हे दोघांनीही सांगितलं आहे, त्यामुळे इतर नेत्यांनी त्याबाबत बोलणं योग्य नाही”, असं केसरकर यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरेंकडे सगळेच आशेने बघत आहेत. ते भविष्यातील मुख्यमंत्री आहेत. त्यामुळेच ते जनतेमध्ये जाऊन आशिर्वाद घेत आहेत. मुख्यमंत्र्याचाही दौरा होणार आहे. याचा फायदा युतीला होईल याची मला खात्री आहे, असं केसरकरांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या 

आनंद दिघे मृत्यू वाद: निलेश राणेंना दीपक केसरकरांचं उत्तर 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *