शिवीगाळ, हाणामारी, मुंबईत ठाकरे गट-शिंदे गट आपसात भिडले

त्रिभाषा सूत्रीचा जीआर रद्द झाल्यानंतर मुंबईत काल ठाकरे गट आणि मनसेकडून जल्लोष सुरु होता. त्याचवेळी दुसऱ्या एका कारणावरुन वर्सोव्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आपसात भिडले. त्यांच्यात शिवीगाळ, हाणामारी झाली.

शिवीगाळ, हाणामारी, मुंबईत ठाकरे गट-शिंदे गट आपसात भिडले
Shivsena Uddhav Thackeray Party Workers
| Edited By: | Updated on: Jun 30, 2025 | 12:41 PM

प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेचा समावेश करण्याचा विषय महाराष्ट्रात मोठा राजकीय मुद्दा बनला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात येत्या 5 जुलै रोजी महामोर्चाच आयोजन केलं होतं. पण त्याआधीच काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस सरकारने त्रिभाषा सूत्रीचा जीआर रद्द करण्याची घोषणा केली. हा निर्णय मागे घेतल्यानंतर काल मनसे आणि ठाकरे गटाकडून जल्लोष सुरु होता. त्याचवेळी मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघात काल शिंदे आणि ठाकरे गटामध्ये वादावादी झाली.

सोशल मिडियाच्या एका कमेंटवरून वादाची ठिणगी पडली. जोगेश्वरीत शिवसेना ठाकरे गट व शिंदे गटात वाद झाला. सोशल मीडियावरील अभद्र टिप्पणीनंतर शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आले. मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिंदे गट शिवसेना आणि ठाकरे गट शिवसेनेच्या शाखाप्रमुखांमध्ये वाद झाला. दोन्ही शाखाप्रमुखांमध्ये आपसात भांडण झाले.

शिवीगाळ आणि हाणामारी

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही शाखाप्रमुखांमध्ये एकमेकांच्या पक्षावर भाष्य करण्यावरून वाद झाला. ही घटना काल रात्री घडली,सध्या परिस्थिती शांत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने छत्री वाटपाचा कार्यक्रम फेसबुक वर लाईव्ह दाखवला. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाने केलेल्या अभद्र टीकेनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची व हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जोगेश्वरीतील रुची बार अँड रेस्टॉरंट बाहेर हे दोन्ही शिवसेनेचे गट आमने-सामने आले. यावेळी शिवीगाळ आणि हाणामारी देखील झाल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र माफी मागितल्यानंतर हे प्रकरण मिटले असल्याचे समजते.