Draupadi Murmu | देशासाठी ऐतिहासिक क्षण, पहिल्या आदिवासी राष्ट्रपतींनी घेतली शपथ, सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्याकडून द्रौपदी मुर्मूंना गोपनीयतेची शपथ

| Updated on: Jul 25, 2022 | 11:31 AM

द्रौपदी मुर्मू यांचे कुटुंब ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील आहे. ओडिशातील त्या आदिवासी नेत्या आहेत

Draupadi Murmu | देशासाठी ऐतिहासिक क्षण, पहिल्या आदिवासी राष्ट्रपतींनी घेतली शपथ, सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्याकडून द्रौपदी मुर्मूंना गोपनीयतेची शपथ
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्लीः देशाचे 15 वे राष्ट्रपती (Indian President) म्हणून यांनी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज संसद भवनात शपथ घेतली. देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा इतिहास आज रचला गेला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा ( N V Ramanna) यांच्याकडून द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली गेली. आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. मावळते राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर सव्वा दहा वाजेच्या सुमारास देशाचे सर न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रि परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांचे संपूर्ण कुटुंबदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मोठ्या फरकानं विजयी झाल्या. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या या निवडणुकीत त्यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिंह यांना पराभूत केले.

रामनाथ कोविंद यांना निरोप

देशाच्या नव्या राष्ट्रपतींनी आज शपथ घेतली. त्यानंतर मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती भवनातून निरोप देण्यात आला. दरम्यान, रामनाथ कोविंद यांनी रविवारी देशाला संबोधित केले. ते म्हणाले, देशाच्या जागरूक आणि जिवंत लोकशाही व्यवस्थेच्या शक्तीला मी नमन करत. गावातील साधारण कुटुंबातून आलेले रामनाथ कोविंद आज देशवासियांना संबोधित करत आहे. तसेच 21 वे शतक हे भारताचे व्हावे या दृष्टीने आपला देश सक्षम होत आहे, असा माझा विश्वास आहे…

मुर्मूंचे कुटुंब ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार

द्रौपदी मुर्मू यांचे कुटुंब ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील आहे. ओडिशातील त्या आदिवासी नेत्या आहेत. 2002-2004 दरम्यान युती सरकारच्या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणूनही काम केलं आहे. ओडिशातील रायरंगपूर हा त्यांचा मतदार संघ असून तेथून त्या आमदार म्हणूनही निवडून आल्या होत्या. आजच्या शपथविधी सोहळ्यात द्रौपदी मुर्मू यांची मुलगी इतिश्री आणि त्यांचे जावई गणेश हेम्ब्रम यासह त्यांचा भाऊ आणि वहिनी एवढे चारच नातेवाईक उपस्थित होते.

समारंभासाठी कोण कोण उपस्थित?

संसद भवनात शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रि परिषदेचे सदस्य, राज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनते प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारचे प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी आदी उपस्थित राहिले. मयुरभंज जिल्ह्यातील सहा भाजप आमदारांसह ईश्वरीय प्रजापती ब्रह्मकुमारी यांच्या रैरंगपूर शाखेतील तीन सदस्य या सोहळ्यात शामिल झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा…

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या. शपथविधी सोहळ्या आधी ते म्हणाले, आदिवासी महिला भगिनी देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहे. ही देशवासियांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.