
गोंदिया | 16 डिसेंबर 2023 : महाराष्ट्राचे उपमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडल आयोग शिवसेना लागू करत नसल्याने छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाचा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी खरपूस समाचार घेतलाय. जेव्हा मंडल आयोगाची स्थापना झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस जन्मालाच आले नव्हते अशी टीका त्यांनी केलीय. फडणवीस प्रत्येक समाजाला खोटे आश्वासन देत आहेत. धनगर समाज, लिंगायत समाज आणि मराठा समाज यांना किती वेळ म्हटलं आमची सत्ता येऊ द्या आम्ही तुम्हाला एका कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. देवेंद्र फडणवीस यांनी असे वक्तव्य अनेकदा केले. पण आजपर्यंत दिलं का.? 2014 च्या निवडणुकीत आमचे सरकार आले तर विदर्भ वेगळा करू. त्याशिवाय मी लग्न करणार नाही असे म्हणाले होते. लग्न केलं का त्यांनी की ते बिचारे अजून अविवाहित आहेत. असा टोला भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
ओबीसी समाजाची एल्गार सभा वर्धामध्ये होती. पण, त्या सभेला छगन भुजबळ प्रकृती मुळे उपस्थित राहणार नाहीत यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, ओबीसी समाजाला सुद्धा कळून चुकलं की छगन भुजबळजी ओबीसीची बाजू घेत आहेत त्याचा हा ढोंगीपणा आहे. काही दिवसातच त्यांचा हा ढोंगीपणा समोर येईल, अशी टीका त्यांनी केली.
भुजबळ यांची तब्येत लवकर दुरुस्त होऊ दे अशी देवाला प्रार्थना करतो. परंतु, यात छगन भुजबळांचा दोष नाही. कारण, त्यांना भाजपाच्या एका मोठ्या नेत्यांनी म्हटलं आहे की तुम्ही सध्या जामिनावर आहात आक्रमक व्हा. त्यामुळे छगन भुजबळ यांना आक्रमक व्हावं लागलं असा टोला त्यांनी लगावला.
मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर बच्चू कडू सुद्धा जरांगे पाटलांसोबत आंदोलन करणार आहेत. आमदार बच्चू कडू जे म्हणाले ते बरोबर आहे. विधानसभेमध्ये जी काही चर्चा झाली त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका सर्वांचीच आहे. परंतु, काही लोक ओबीसींना समोर करून वातावरण दूषित करण्याच्या प्रयत्न करीत आहेत असे जाधव म्हणाले.
दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जे लोक करत होते त्यांचे पितळ उघडे पडले आहे. ओबीसींचे आरक्षण कमी करून इतर लोकांना देण्यात यावं असे कोणत्याच पक्षांच्या नेत्याने म्हटले नव्हते. मग, तुम्ही अशा प्रकारचे वातावरण का दूषित करतात. काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार असतानाही कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचे ठरलं होतं असे आमदार जाधव यांनी स्पष्ट केले.