Jalgaon DCC Bank Election: जळगावमध्ये महायुतीत महाभारत! शिंदेंचे आमदार संतापले, गुलाबराव पाटलांना सुनावलं
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील संघर्षावर गुलाबराव पाटलांनी याबाबत मध्यस्थी करून दोघांची समजूत काढू अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरुनही आमदार किशोर पाटील यांनी थेट गुलाबराव पाटलांना टार्गेट केले.

खेमचंद कुमावत प्रतिनिधी: जळगावमध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. महायुतीच्या मेळाव्यात मंगेश चव्हाण यांनी मुलगा सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज आपणच अवैध केला आणि नंतर वैध करण्यासाठीही आपणच प्रयत्न केल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर सुमित पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. आता आमदार किशोर पाटील यांनी मुलगा सुमित यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
आमदार किशोर पाटील यांच्याकडून मुलाच्या विधानाचे समर्थन..!
“महायुतीच्या भर मेळाव्यात मी अर्ज अवैध केला असं एखादा आमदार म्हणत असेल तर आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करत नाही. महायुतीच्या मेळाव्यात सुमित पाटील याचा स्वाभिमान जागृत झाला म्हणून त्याने समोरच्याला ज्या भाषेत उत्तर कळत असेल त्या भाषेत त्यांनी उत्तर दिले,” असे म्हणत आमदार किशोर पाटील यांनी मुलाच्या विधानाचे समर्थन केले.
तसेच “एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोट आपल्याकडे आहे, असा समोरच्याने विचार करायचा. भाजपाचा महायुतीचा जबाबदार आमदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव टाकून मी उमेदवारी अर्ज दाखल केला असं सांगायची हिंमत करत असेल तर पहिले आपले संस्कार तपासा,” असा घणाघात किशोर पाटील यांनी केला आहे.
गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील संघर्षावर गुलाबराव पाटलांनी याबाबत मध्यस्थी करून दोघांची समजूत काढू अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरुनही आमदार किशोर पाटील यांनी थेट गुलाबराव पाटलांना टार्गेट केले.
“गुलाबराव पाटलांनी व अन्य कोणी मला समजाविण्याचा प्रयत्न करू नये. तेवढी अक्कल , बुद्धी व क्षमता आमच्यात आहे,” अशी टीका किशोर पाटील यांनी केली आहे. गुलाबराव पाटलांच्या प्रतिक्रियेवर आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारीवरुन झालेल्या या आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीतील वादंग तीव्र होण्याची शक्यता आहे.