दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं, पण कुमारस्वामींचं दोन्हीही वेळा ‘बॅड लक’

सत्ताधारी पक्षांचे आमदार गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. आमदारांनीच बंडखोरी केल्यामुळे अखेर सरकार कोसळलं. कुमारस्वामी यांचं सरकार 23 मे 2018 रोजी अस्तित्वात आलं होतं आणि 23 तारखेलाच त्यांचं सरकार कोसळलं.

दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं, पण कुमारस्वामींचं दोन्हीही वेळा 'बॅड लक'

बंगळुरु : गेल्या दोन आठवड्यांपासूनच्या नाट्यमय घडामोडींनंतर कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांचं सरकार पडलं. विश्वासदर्शक ठरावावेळी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी (HD Kumaraswamy) बहुमत सिद्ध करु शकले नाही. यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळून भाजपचं सरकार येणं निश्चित झालंय. बहुमत चाचणीमध्ये सरकारच्या बाजूने फक्त 99 मतं पडली. सत्ताधारी पक्षांचे आमदार गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. आमदारांनीच बंडखोरी केल्यामुळे अखेर सरकार कोसळलं. कुमारस्वामी यांचं सरकार 23 मे 2018 रोजी अस्तित्वात आलं होतं आणि 23 तारखेलाच त्यांचं सरकार कोसळलं.

दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद सोडण्याची वेळ

एचडी कुमारस्वामी यांना बंडखोर आमदारांमुळे खर्ची गमवावी लागली, पण 2006 मध्ये अशाच प्रकारे कुमारस्वामींच्या नेतृत्त्वात 42 आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार होतं, तर काँग्रेस नेते धर्म सिंह हे मुख्यमंत्री होते. कुमारस्वामी यांनी 42 आमदारांसह पाठिंबा काढून घेतला आणि सरकार कोसळलं.

28 जानेवारी 2006 रोजी कर्नाटकचे राज्यपाल टीएन चतुर्वेदी यांनी कुमारस्वामी यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. कुमारस्वामींच्या नेतृत्त्वात जेडीएस आणि भाजप यांनी मिळून सत्ता स्थापन केली. कुमारस्वामी 4 फेब्रुवारी 2006 ते 9 ऑक्टोबर 2007 या काळात मुख्यमंत्री राहिले. 27 सप्टेंबर 2007 रोजी यांनी 3 ऑक्टोबर रोजी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. कारण, मुख्यमंत्रीपदासाठी तसा फॉर्म्युला ठरला होता आणि त्यानुसार राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 8 ऑक्टोबर रोजी कुमारस्वामी यांनी राजीनामा दिला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.

2018 मध्ये आश्चर्यकारक संधी, दीड वर्षाच्या आत राजीनामा

गेल्या वर्षी कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 105 जागा मिळवल्या. काँग्रेसला 80 आणि जेडीएसला 37 जागांवर विजय मिळाला. 17 मे 2018 रोजी भाजपचे नेते बीएस येदियुरप्पा यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण येदियुरप्पा बहुमत सिद्ध करु न शकल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. 19 मे 2018 रोजी येदियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस यांनी सत्ता स्थापन केली. कुमारस्वामी यांना आश्चर्यकारकरित्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली.

काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिलं खरं, पण काँग्रेसचेच अनेक आमदार नाराज झाले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या गटाने अनेकदा बंडखोरीचीही भाषा केली. शिवाय हे सरकार चालवताना कुमारस्वामी यांनी अनेकदा हतबलताही व्यक्त केली होती.

अखेर पुन्हा एकदा कर्नाटकात राजकीय संकट ओढावलं आणि 6 जुलैला काँग्रेस-जेडीएसच्या 12 आमदारांनी राजीनामा दिला. हा आकडा आणखी वाढतच गेला आणि एकूण 16 आमदार सत्ताधारी पक्षापासून दूर झाले. त्यात दोन अपक्षांनीही भाजपला पाठिंबा दिला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI