फडणवीसांकडून मावळ गोळीबाराची आठवण, आता पवारांनी मावळातील वस्तुस्थितीच मांडली!

| Updated on: Oct 13, 2021 | 3:07 PM

मावळ गोळीबारावेळी पवारांना जालियनवाला बाग हत्याकांड का आठवलं नाही? असा सवाल केलाय. फडणवीसांच्या या प्रश्नाला आता शरद पवार यांनी जोरदार उत्तर दिलंय. मावळमधील गोळीबाराला कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता जबाबदार नव्हता. तर पोलिसांनी तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उचललेलं पाऊल होतं, असं पवार म्हणाले.

फडणवीसांकडून मावळ गोळीबाराची आठवण, आता पवारांनी मावळातील वस्तुस्थितीच मांडली!
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई : लखीमपूर हिंसाचारावरुन राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यानंतर मावळ गोळीबारावेळी पवारांना जालियनवाला बाग हत्याकांड का आठवलं नाही? असा सवाल केलाय. फडणवीसांच्या या प्रश्नाला आता शरद पवार यांनी जोरदार उत्तर दिलंय. मावळमधील गोळीबाराला कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता जबाबदार नव्हता. तर पोलिसांनी तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उचललेलं पाऊल होतं, असं पवार म्हणाले. (Sharad Pawar’s reply to Devendra Fadnavis’s criticism on Maval Firing case)

पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

लखीमपूरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्यं केलं. त्यांनी विचारलं की मावळमध्ये काय घडलं? त्यांनी विचारलं ते फार बरं केलं. मावळमध्ये शेतकरी मृत्यूमूखी पडले. पण त्यांच्या मृत्यूला कोणत्या राजकीय पक्षाचे नेते नव्हते. आरोप पोलिसांवर होता. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी काही पावलं उचललं होती. मावळच्या शेतकऱ्यांवर जो गोळीबार झाला. त्याबाबत लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांवर मोठी नाराजी होती. तिच स्थिती आज लखीमपूरच्या बाबतीत आहे, असं शरद पवार म्हणाले.

‘..तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल’

त्याचबरोबर मावळमध्ये आता चित्र बदललं आहे. लोकांना वस्तुस्थिती कळाली आहे. माझ्या जिल्ह्यातील तालुका असल्यामुळे सांगत, मावळ तालुक्यात सातत्यानं जनसंघ, नंतर भाजप होतं. रामभाऊ म्हाळगी हे नेहमी मावळचे प्रतिनिधी होते, असंही पवार म्हणाले. इतकंच नाही तर मावळमध्ये लोकांना भडकावण्याचं काम कुणी केलं हे लक्षात आल्यानंतर त्या मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सुनील शेळके हे 90 हजाराच्या फरकानं निवडून आले आहेत. मावळमध्ये संताप असता तर एवढ्या फरकानं राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला नसता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळची स्थिती समजून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का? लखीमपूर घटना निंदनीय आहेच. पण मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला गेला. त्यावेळी त्यांना जालियनवाला बाग आठवला नाही का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. आजचा बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्नही फडणवीसांनी विचारलाय.

इतर बातम्या :

‘अजुनी यौवनात मी’, खासदार संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला

तपास यंत्रणेकडून देशमुखांच्या घरी पाचवेळा छापा मारण्याचा विक्रम, शरद पवारांचा घणाघाती हल्ला

Sharad Pawar’s reply to Devendra Fadnavis’s criticism on Maval Firing case