महाविकासआघाडी सरकारने ओबीसींना काहीच दिलं नाही, मराठा समाजाला भरभरुन निधी दिला: प्रकाश शेंडगे

| Updated on: Nov 29, 2020 | 6:51 PM

सरकारने ओबीसी समाजाच्या विकासासाठी उपसमिती स्थापन केली होती. पण बैठकांपलीकडे फार काही घडलेच नाही. | Prakash Shendge

महाविकासआघाडी सरकारने ओबीसींना काहीच दिलं नाही, मराठा समाजाला भरभरुन निधी दिला: प्रकाश शेंडगे
Follow us on

मुंबई: महाविकासआघाडी सरकारने ओबीसी (OBC) समाजासाठी केवळ घोषणाच केल्या, पण काही दिलं नाही. याउलट मराठा समाजाला भरभरून निधी देण्यात आला. हा अन्याय आम्ही आता सहन करुन घेणार नाही, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी दिला. (OBC leader Prakash Shendge criticises Mahavikas Aghadi govt)

प्रकाश शेंडगे यांनी रविवारी मुंबईत ‘व्ही 9 मराठी’ खास बातचीत केली. राज्य सरकार कोव्हिडशी लढण्यात यशस्वी ठरले. पण सरकारने ओबीस समाजावर अन्याय केला. सरकारने ओबीसी समाजाच्या विकासासाठी उपसमिती स्थापन केली होती. पण बैठकांपलीकडे फार काही घडलेच नाही. त्यामुळे सरकारने आता ही समिती बरखास्त करावी, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली.

सरकारमधील नेते मराठा आणि ओबीसी वाद लावत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करतात. मात्र, हा वाद त्यांच्या काळात सुरु झाला आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातून आरक्षण दिले. त्यामुळे या वादासाठी फडणवीस सरकारच कारणीभूत आहे, असा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला.

महाविकासआघाडी सरकारने वर्षभरात ओबीसी समाजासाठी केवळ घोषणाच केल्या, पण दिलं काहीच नाही. याउलट मराठा समाजाला भरभरून निधी देण्यात आला. गेल्या आठवड्यात SEBC प्रवर्गातील मुलांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याबाबत जीआर काढण्यात आला. हा जीआर रद्द व्हावा यासाठी मराठा समाज शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचे समजले. त्यानंतर सरकारने हा जीआर रद्द केला तर ओबीसी समाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरावर मोर्चा काढेल, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी महाविकासआघाडी सरकारला दिला.

आगामी काळात ओबीसी समाजाचे आरक्षण वाचावे यासाठी आम्ही ‘बीसींची वारी, आमदारांच्या दारी’, अशी मोहीम सुरु केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचावा यासाठी आम्ही पुढील आठवड्यात ही वारी घेऊन ‘मातोश्री’च्या जवळचे नेते असलेल्या अनिल परब यांच्या घरी जाणार आहोत. सर्व मंत्र्यांना सळो की पळो करुन सोडू, असेही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

‘छगन भुजबळांनी ‘त्या’ लोकांची नावं जाहीर करावीत’

मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येतात, असे वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. त्यावर प्रकाश शेंडगे यांनी भाष्य केले. छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील या लोकांची नावे फोडावीत, ओबीसी समाजाचे शत्रू कोण आहेत, हे जगासमोर आणावं, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

मंत्रालयात झारीतले शुक्रराचार्य खूप, OBC आरक्षणावर गदा येत असेल तर लढावंच लागेल : छगन भुजबळ

‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो’, उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

(OBC leader Prakash Shendge criticises Mahavikas Aghadi govt)