घडामोडींना वेग… राजभवनाबाहेर अचानक बंदोबस्त वाढला, आजच नव्या मंत्र्यांचा शपथविधी?; किती मंत्री घेणार शपथ?

राज्यमंत्रिमंडळाचा आजच विस्तार होण्याची शक्यता आहे. देवगिरी या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या सहकाऱ्यांशी सुरू असलेली बैठक आणि राजभवनावर अचानक पोलिसांचा बंदोबस्त वाढल्याने ही शक्यता वर्तवली जात आहे.

घडामोडींना वेग... राजभवनाबाहेर अचानक बंदोबस्त वाढला, आजच नव्या मंत्र्यांचा शपथविधी?; किती मंत्री घेणार शपथ?
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 12, 2023 | 1:13 PM

मुंबई : येत्या सोमवारपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षाच्या बहुतेक आमदारांनी मुंबईतच ठाण मांडलं आहे. तर काही आमदार मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक सुरू झाली आहे. तर राजभवनावरही अचानक पोलीस बंदोबस्त वाढल्याने हालचालींना वेग आला आहे.

आज संध्याकाळी राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. राजभवनाबाहेर अचानक पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढल्याने ही शक्यता अधिक वर्तवली जात आहे. शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादीच्या एकूण 8 ते 10 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. अचानक या हालचाली वाढल्याने या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विदर्भातील सत्ताधारी पक्षातील 90 टक्के आमदार मुंबईत तळ ठोकून असल्याने या शक्यतांना अधिक बळ मिळत आहे.

अजितदादांची बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे उपस्थित आहेत. या बैठकीत खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य

सोमवारपासून तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप करतील. मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असे वाटते, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. साताऱ्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीला देण्याबाबत विचारलं असता जो निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं ते म्हणाले.

विस्तार होणारच

मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे. आम्ही आता वेटिंगला आहोत. अजितदादा गट सोबत आला म्हणून थोडा उशीर झाला. आता फक्त फोन यायची वाट पाहतोय. आम्ही तयार आहोत. मंत्रीपदाबरोबरच रायगडचे पालकमंत्रीपदही मलाच मिळणार यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रही राहणार आहे, असं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले. अदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केलं असेल तरी मी त्याच्यापेक्षा मी चांगलं काम करेन. शेवटी महिला आणि पुरुषात काही फरक आहे की नाही? असंही ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे त्यात काही वाद नाही, असा दावा त्यांनी केला.