महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची ‘सर्वोच्च’ सुनावणी पुन्हा लांबणीवर?, उद्या होणाऱ्या सुनावणीत महाराष्ट्राचं प्रकरण नाही

| Updated on: Aug 22, 2022 | 9:03 PM

सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी उद्या म्हणजे 23 ऑगस्टला होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता उद्या होणाऱ्या सुनावणींमध्येही महाराष्ट्रातील प्रकरण नाही. त्यामुळे ही सुनावणी अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च सुनावणी पुन्हा लांबणीवर?, उद्या होणाऱ्या सुनावणीत महाराष्ट्राचं प्रकरण नाही
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण उद्या होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत महाराष्ट्रातील प्रकरण नाही. त्यामुळे गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Politics) सुनावणी दोन वेळा लांबणीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. आज (22 ऑगस्ट) ही सुनावणी (Supreme Court hearing) पार पडणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी उद्या म्हणजे 23 ऑगस्टला होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता उद्या होणाऱ्या सुनावणींमध्येही महाराष्ट्रातील प्रकरण नाही. त्यामुळे ही सुनावणी अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केलंय. हे सत्तांतर घटनात्मक आहे की घटनाबाह्य यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात पक्षांतर बंदी कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार? या प्रकरणावरील निकाल पुढील राजकारणासाठी दिशादर्शक ठरणारा असेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणीत निर्णय दिला जाणार की हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं जाणार हे देखील पाहावं लागणार आहे. त्यासोबतच खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची? हे प्रकरणही सर्वोच्च न्यायालयात आहे.

सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा निवृत्तीपूर्वी निकाल देणार?

त्यातच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे रमण्णा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत जाता जाता निकाल देणार का? की हे प्रकरण खंडपीठाकडे सोपवलं जाणार? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. तर शिंदे गटाची कमान हरीश साळवे यांच्याकडे आहे. निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार हे केस लढत आहेत.

माझा न्यायदेवतेवर विश्वास – उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीत जनता गद्दारांना चांगला धडा शिकवेल, असा दावा केला आहे.