Maharashtra Politics: ‘मी शरद पवारांचा नातू नाही, पातळी सोडाल तर..’, बड्या नेत्याचा रोहित पवारांना इशारा
माझं तोंड उघडायला भाग पाडू नका. कारण माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहित आहे," अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवार यांना इशारा दिला आहे.

MLA Jaykumar Gore ON Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बैठका बालाजी सरोवर इथ घेतात. सकाळ दुपार संध्याकाळ ते कष्ट करतायत, कष्ट जास्त झाले की माणूस गोळ्या खातो, अशी टीका रोहित पवार यांनी जयकुमार गोरेंवर केली होती. यावरुन आता आमदार जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांना थेट इशारा दिला आहे.
काय म्हणालेत आमदार गोरे?
“माझा राजकीय जीवनातील संघर्ष मोठा आहे. मी शरद पवारांचा नातू नाही. उद्योगपतीचा मुलगा नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही. आजोबा आणि चुलत्याचे नाव घेऊन राजकारण करत नाही. एक-दोनदा नव्हे चार वेळा निवडून आलोय. त्यामुळे मी चुकत असेल तर माझ्यावर टीका करा. परंतु पातळी सोडून टीका करणाऱ्यांवर मलाही खालच्या पातळीवर जाऊन उत्तर देता येते. माझं तोंड उघडायला भाग पाडू नका. कारण माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहित आहे,” अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवार यांना इशारा दिला आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
आमदार रोहित पवार यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत टीका केली होती. याच टीकेला गोरे यांनी मोठी टोलेबाजी करत उत्तर दिले आहे. तसेच “माझा इतिहास माहित आहे मला तोंड उघडायला भाग पाडू नका. असा इशारा आहे रोहित पवारांना गोरे यांनी दिला आहे. एकूणच सोलापूरच्या आणि एकंदर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात जयकुमार गोरे विरुद्ध आमदार रोहित पवार असा नवा संघर्ष सुरू झाला आहे.