एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा झटका, आमदार नाराज, भाजपमध्ये प्रवेश करणार? मोठ्या हालचालींना वेग
शिंदे गटाचे जळगावमधील आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीमुळे एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. स्थानिक निर्णयप्रक्रियेतून डावलले गेल्याने आणि जिल्हा बँक निवडणुकीत जागा न मिळाल्याने ते नाराज आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना वेग आला असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो.

शिंदे गटातून सर्वात मोठी बातमी आहे. इतर राजकीय पक्षाचं ऑपरेशन टायगर करणाऱ्या एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे जळगावच्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे नाराज असून ते भाजपच्या आवाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे. पक्षातून डावललं जात असल्याने चंद्रकांत पाटील नाराज आहेत. त्यामुळे पाटील लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक पातळीवरच्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जात नाही. निर्णय प्रक्रियेतून डावललं जात असल्याने शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील नाराज आहेत. तसेच जळगाव जिल्हा बँकेत कार्यकर्त्यासाठी एकही जागा न दिल्याने त्यांची नाराजी अधिकच वाढली आहे. या निवडणुकीत जागा मागूनही त्यांना दिली नाही. त्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांनी महायुतीचे मेळावे आणि बैठकांना जाणं टाळण्यास सुरुवात केली आहे. चंद्रकांत पाटील हे राजकीय भूकंप करण्याची शक्यता आहे. ते शिवसेनेला राम राम ठोकणार असून भाजपच्या वाटेवर असल्याचं सूत्रांनी सांगितलं. जिल्हा बँकेची निवडणूक पार पडल्यावर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चंद्रकांत पाटील मोठा निर्णय घेणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
नाराजी स्वाभाविक
दरम्यान, पाटील यांच्या नाराजीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रत्येक आमदाराला एक जागा मिळाली, पण चंद्रकांत पाटील यांनी एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत, असं गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर, निवडणुकीला अजून दोन दिवस बाकीत आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचे जेवढे प्रयत्न करता येईल, तेवढे आम्ही करणार आहोत. सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. त्यांना जागा मिळायलाच हवी होती. त्यामुळे त्यांची नाराजी असणं स्वभाविक आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
नाराजी तात्कालिक
दरम्यान, राजकीय विश्लेषक शेखर पाटील यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका निवडणुकीवरून चंद्रकांत पाटील इतक्या टोकाचा निर्णय घेतील असं वाटत नाही. पण जळगाव जिल्ह्यात शिवसेनेत अंतर्गत कलह आहे. या निवडणुकीत हा कलह अधिक उफाळून आला आहे. किशोर अप्पा पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनी पक्षाबद्दलची नाराजी जाहीर व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांची नाराजी स्थानिक पातळीवरची आहे. खडसे कुटुंबीयांविरोधात ते एकमेव लढतात. त्यांना जागा मिळाली नाही म्हणून ते नाराज आहेत. पण त्यामुळे ते पक्षांतर करतील असं वाटत नाही. ही नाराजी तात्कालिक असेल. खडसे आणि पाटील या ध्रुवावर मुक्ताईनगरचं राजकारण फिरतंय. तेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिसून आलं आहे, असं शेखर पाटील यांनी सांगितलं.